संडे फिचर

थाळनेर आणि लळिंग व फारुकी सुलतान

महाराष्टाच्या उत्तरेचा खानदेश हा तुलनेने खूपच उपेक्षित राहिलेला भूभाग आहे. येथील अहिराणी बोलीचाही आपल्याला पुरेसा परिचय नसतो. नंदूरबार-धुळे आणि जळगांव या सध्याच्या महाराष्ट राज्यातील जिल्ह्यांबरोबरच बर्‍हाणपूर, हंडिया व बिजागड हा मुलूखही प्राचीन व मध्ययुगीन खानदेशाचेच भाग मानायला हवेत. बहमनी राज्याच्या विघटनानंतर निर्माण झालेल्या, निजामशाही, अदिलशाही, बरीदशाही इमादशाही आणि कुतुबशाही या पाच शाह्यांचा आपल्याला थोडातरी परिचय असतो. पण दिल्लीच्या तुघलकांपासून मोगलांच्या अकबरापर्यंतच्या म्हणजे १३८२ ते १६०१ अशा २०० वर्षांहून अधिक काळ खानदेशात राज्य करणारी फारूकशाही आणि त्यातील तब्बल दहा सुलतान आपल्या खिजगणतीतही नसतात.

रामायण, महाभारतात ऋषिक देश म्हणून ओळखला जाणारा तापी खोर्‍यातील संपन्न भूभाग मौर्य सातवाहन, नहपान क्षत्रय अहिर वाकाटक चालुक्य सेंद्रक निकुंभ राष्टकूट राजपूत बागलाणचे राठोड वंशीय यादव खिलजी तुघलक बहमनी फारूकी सुलतान मोगल पेशवाई आणि ब्रिटीश अशा सत्तांच्या चढउतारांचा साक्षीदार आहे. सध्याच्या धुळे जिल्ह्यात रायकोट, भामेर, सोनगीर, लळिंग आणि थाळनेर असे पाच किल्ले आहेत. बलसाणे, वाघली, पाटणे, मेठी, चांगदेव अशा गावांमध्ये अत्यंत देखणी प्राचीन व शिल्पसमृध्द मंदिरेही आहेत.

प्रदीर्घ काळ थाळनेर येथे तर फारूकी सुलतानांची राजधानीही होती. नुकतेच निधन झालेल्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आजोळही थाळनेरचेच. तेथे १९३२ ते १९३७ अशी पाच वर्षे त्यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळा क्रमांक थाळनेर येथे झाले. महाराष्टात गवताळ कुरणांचे प्रदेश अभावानेच आढळतात. पण लळिंगच्या परिसरातील गवताळ कुरणांच्या जोरावर तेथील फारूकी सुलतानांनी बलाढ्य घोडदळाची निर्मिती आणि उपयोग केलेला दिसतो.

हुजराह किंवा एस्तानाह हा फारूकी सुलतानांच्या कबरींचा समूह आवर्जून भेट देण्याजोगाच आहे. येथे मिरन मुबारकखान या पाचव्या फारूकी सुलतानाची भव्य कबर आगळीवेगळी व आवर्जून अभ्यासण्याजोगी आहे. मांडू/ मांडवगड येथील होशंगशहाच्या कबरीच्या इमारतीप्रमाणेच तिची रचना केलेली आहे. एकावर एक अशा तीन चौथर्‍यांवर मुख्य चौकोनी वास्तूवर पसरट असा घुमट आहे. या इमारतीचा दर्शनी भाग उंच व भव्य आहे. मुख्य दरवाजा आणि खिडक्यांच्या जागाही महत्वाच्या. इमारतीच्या चारही बाजूंना काढलेले सज्जे आणि छतावर पडणार्‍या पावसाचे पाणी काढून टाकण्यासाठी केलेली पागोळ्यांची योजना अभ्यासण्याजोगी.

मध्यवर्ती घुमटाला साजेसे असे चारही कोपर्‍यांवर लहान बुरूज ही वेगळीच रचना वाटते. मुख्य प्रवेशदारावर दोन्ही बाजूला उंच व भिंतीला चिकटलेले स्तंभ आणि तेथे असणारे रेखीव वळणदार अक्षरांचे अरबी पर्शियन शिलालेख डोळ्यात भरतात. मिरन मुबारक खानासाठी महान दयाळू प्रेमळ महान योध्दा अशी विशेषणे या शिलालेखात वापरलेली आहेत. इमारतीच्या बांधकामात इस्लामी पद्धतीची मिहराब, तिची तिहेरी घडणावळ आणि कोपर्‍यांवर असलेले हस्त किंवा ब्रॅकेट्सही महत्वाचे ठरतात. फारूकी सुलतानांच्या कबरींचा समूह पुरातत्वखात्याने कुंपण घालून कुलूपबंद करून संरक्षित केला आहे. पण येथे फारसे कोणी फिरकत नसल्याने, तेथे झाड-झाडोरा खूप माजला आहे. त्यामुळे काटे, साप, विंचू यांचे भय आहे. याच थाळनेर गावात एखाद्या गढीसारखा दिसणारा व कित्येक शतकांचा साक्षीदार असणारा जामदारवाडा मुद्दाम भेट द्यावा असाच आहे. त्याचे देखणे प्रवेशदार, सुबक नक्षीदार खिडक्या व तळघर ही वैशिष्टये नजरेत भरतात.

थाळनेरच्या महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख असणारे प्रा. डॉ. सतीश मधुकर बोरसे सरांनी थाळनेरचा किल्ला आणि फारूकी सुलनातांचा तपशीलवार अभ्यास केला आहे. १९६७ मध्ये श्री. पी.पी. वैशंपायन यांना थाळनेरमध्ये दोन ताम्रपट मिळाले. ६-७ व्या शतकातील कुंभकर्ण वंशीय भानुशेण राजाचे हे ताम्रपट अतिशय महत्वाचे आहेत. चोपडा येथील पंकज महाविद्यालयात प्रपाठक असणार्‍या प्रा. डॉ. टी.टी महाजन सरांनी १. खानदेशचा राजकीय व सांस्कृतिक इतिहास (१९९८) आणि २. प्राचीन खानदेशचा इतिहास व संस्कृती हे दोन अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले आहेत.

इतिहास व संस्कृती हे दोन अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले आहेत. प्रा. डॉ. सौ. सुलोचना अ. पाटील लिखित मध्ययुगीन खानदेशचा इतिहास हे छोटे खानी पुस्तकही उपलब्ध आहे. थाळनेर किल्ल्याचे अखेरचे पतन – तापी नदीकाठी असणार्‍या श्री थाळनेणश्वर महादेव मंदिराशी तापी नदीला समांतर अशी १०-१२ मीटर उंचीची भक्कम दगडी तटबंदी, त्यातील भव्य बुरुज पण आता दुर्ग संवर्धनाच्या नावाखाली अलिकडेच बांधलेली विटांची बेढब चर्यांची (कमलपत्रांसारखी रचना) निर्मिती विशोभित तर दिसतेच. पण ते अनैतिहासिकही आहे. ती पाडून टाकायला हवी. या किल्ल्याच्या उंचवट्याकडे पूर्वेकडून येणारी वाट ईशान्येकडून गडमाथ्याकडे नेते. एकेकाळी एकाच्या मार्‍यात दुसरा असे पाच भक्कम दरवाजे होते.

ते गडावर केलेल्या नव्या चुकीच्या दुर्ग संवर्धनात पार भुईसपाट केले गेले. २७ फेब्रुवारी १८१८ रोजी सर टॉमस हिस्लॉप हा छिंदवाड्याहून थाळनेरवर ससैन्य चालून आला. दोन हॉवित्झर तोफा, दहा सिक्स पाऊंडर तोफा त्याने ईशान्य बुरुजाखाली ३० मीटर अंतरापर्यंत उंच नेऊन तेथून भडिमार सुरू केला. किल्लेदार शरणागती पत्करेना म्हणून ले.क. कॉन्वे, ले. क. मॅकग्रेगर, क. मरे, मे. गॉडन व थोडे सैनिक झुंजत पाचव्या दरवाज्याशी पोहोचले. तेव्हा वाटाघाटींची तयारी दाखवून विश्वासघाताने ही ब्रिटीश आक्रमक मंडळी दार फोडून आत घुसली. किल्ल्यावरील सैनिकांची सरेआम कत्तल केली. त्यात दोन-अडीचशे सैनिकांना वीरमरण आले. किल्लेदाराला पकडून दरवाज्याशेजारी बुरुजावर फाशी दिली गेले. त्या दुर्दैवी वीरांना मानाचा मुजरा!

थाळनेर किल्ल्यातील दरवाज्याशी असणार्‍या एका ऐतिहासिक शिलालेखाचे जतन धुळ्याच्या राजवाडे संशोधन मंडळाच्या संग्रहालयात केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये