“…तोपर्यंत डोळे मिटणार नाही, वर गेल्यावर बाळासाहेबांना काय उत्तर देऊ, ठाकरेंचा शिलेदार गहिवरला

सिंधुदुर्ग : (Subhash Desai On Balasaheb Thackeray) निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. राज्यभर ठाकरेंच्या गटातील नेत्यांचे दौरे सुरु आहेत. ‘शिवगर्जना यात्रा’ राज्यभर सुरु आहे. कोकण ते विदर्भात शिवगर्जना यात्रा सुरु आहे. कोकणातील सावंतवाडी येथे बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत, शिवसैनिकांशी संवाद साधताना काहिसे गहिवरलेले पाहायला मिळाले. ते म्हणाले, शिवसेनेला गतवैभव मिळवून दिल्याशिवाय डोळे मिटणार नाही, वर गेल्यावर बाळासाहेबांना काय उत्तर देऊ. यामुळं शिवसैनिकांसह संपूर्ण सभागृहातील वातावरण भावनिक झालं होतं.
पुढे बोलताना देसाई म्हणाले, “जो पर्यंत शिवसेनेला गतवैभव मिळवून देत नाही तो पर्यत डोळे मिटणार नाही. जीवात जिव असे पर्यंत मी पुन्हा एकदा गद्दारांशी लढणार आहे”, अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मांडली.
दरम्यान, भाषणात शिवसैनिकांना आवाहन करताना ते काहीसे गहिवरले. “शिवसेना अडचणीत असताना मी असाच समजा वर गेलो तर मला बाळासाहेब पुन्हा खाली ढकलून देतील”, असं सुभाष देसाई म्हणाले. पुन्हा एकदा बाळासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवून तीच ताकद पुन्हा निर्माण केली जाईल, असे त्यांनी सांगितले. सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या शिवगर्जना मेळाव्यात ते बोलत होते.
मी गेली ५७ वर्षे शिवसेनाप्रमुखांसोबत काम केले आहे. पहिल्या सभेपासून आज पर्यत मी शिवसेनेसोबत आहे. त्यामुळे मी या वयात सुध्दा शिवसेनेसाठी सगळीकडे फिरत आहे. मी असेच फिरत असताना अनेक जण तुम्ही या वयात का फिरता? असे विचारतात. मात्र, पक्ष आणि पक्षप्रमुख अडचणीत असताना हे केलेच पाहिजे. त्यामुळे जीवात जीव असे पर्यत मी शिवसेनेसाठीच कार्यरत राहणार आहे, असे सांगून ज्या लोकांना शिवसेनेने मोठे केले त्यांना अडचणीत आणण्याचे काम गद्दारांनी केले. त्याच्याबाबत न बोललेलेच बरे, असे सांगून सुभाष देसाई गहिवरले.