शरदचंद्र पवार पक्षात इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उत्तर महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. नगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या पाच जिल्ह्यांमधील सुमारे ३०० हून अधिक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. नगरच्या उमेदवारांसह कर्जत जामखेडचे आमदार रोहीत पवार यांच्यासह अनेक नव्या-जुन्या चेहऱ्यांनी मुलाखतीसाठी हजेरी लावली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांच्या निसर्ग येथे मुलाखती घेण्यात येत आहेत. इंदापुर येथील हर्षवर्धन पाटील यांची प्रवेशाची सभा संपवून पवार दुपारी साडे तीन वाजता पुण्यात दाखल झाले. त्यानंतर पक्षाच्या संसदीय मंडळाच्या उपस्थितीत मुलाखतींना सुरवात झाली. पवार यांनी इच्छुक उमेदवारांची मते जाणुन घेतली.
नगर, नंदुरबार, धुळे, जळगाव व नाशिक या जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, पक्षातील निवड समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. आजी-माजी आमदार, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्षांसह विविध पदांवरील, तरुण व जुन्यांसह नव्या चेहऱ्यांनी मुलाखतीसाठी गर्दी केली होती.
नाशिकमधील १५ मतदारसंघातुन सर्वाधिक १५० हून अधिक इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली. त्यापाठोपाठ नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यातील उमेदवारांची संख्या होती. इच्छुक उमेदवारांसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या परिसरात मोठ्या संख्येने हजेरी लावत शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.
नगर जिल्ह्यातील अकोला, कोपरगाव, राहुरी, पाथर्डी-शेवगाव, नगर शहर, कर्जत-जामखेड, श्रीगोंदा – नगर, पारनेर – नगर अशा आठ मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. कर्जत जामखेडमधुन रोहीत पवार, श्रीगोंदा येथुन राहुल जगताप, अण्णासाहेब शेलार, बाबासाहेब भोस, टिळक भोस, श्रीनिवास नाईक यांनी तर पारनेरमधुन माधवराव लामखडे, रोहीदास कर्डीले, नगरमधून अभिषेक कळमकर, डॉ.अनिल आठरे, शौकत तांबोळी यांच्यासह आठ मतदारसंघातुन २१ ते २२ जणांनी मुलाखती दिल्या.
उमेदवारांकडुन मतदारसंघाची रचना, जातनिहाय गणित, मतदारसंघात स्वतः केलेल्या कामाची माहिती देत इतर उमेदवारांच्या तुलनेत आपली बाजु मांडण्याचा प्रयत्न इच्छुकांनी केला. तर पवार यांच्यासह संसदीय मंडळातील पदाधिकाऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उमेदवारांनी समर्पक उत्तरे दिली.