देश - विदेशपुणेमहाराष्ट्रलेख

तुका म्हणे खुंटे आस। तेणे वास करिती॥

ह. भ. प. बाळासाहेब बडवे |

देहू भेटीच्या निमित्ताने…

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा कळस ठरलेले आणि श्री विटेवरच्या पांडुरंगाचे परमभक्त असलेले जगद्गुरू तुकाराम महाराज, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे प्रतिवर्षीप्रमाणे पंढरपूरला प्रस्थान होण्यापूर्वीच्या पार्श्वभूमीवर आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या चरणांवर नतमस्तक होत आहेत. भारतातील संत परंपरा एक दिव्यत्वाची तेजस्वी प्रतिमा दिसून येते. जगद्गुरू आद्य शंकराचार्यांपासून ते संत निळोबारायांपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जे संत-महात्मे आणि आध्यात्मिक महापुरुष होऊन गेले त्यांनी मार्गदर्शित केलेल्या वाङ्मयीन वाटेवरून हा भारत जात असतानाच संतांच्या परंपरेची मांदियाळी या राष्ट्राला एक वैभवसंपन्नता निर्माण करून देत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकारणाव्यतिरिक्त एक वेगळी ओळख भारतीय समाजासमोर सातत्याने आलेली दिसते. कै. एकनाथजी रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक निर्मितीचे महान कार्य पूर्ण केले गेले, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या तीर्थरूपांबरोबर रेल्वे स्थानकावर चहा देऊन प्रवाशांची सेवा करताना जो एक भाव त्यांच्या अंगी स्थिरत्व प्राप्त करून होता तोच सेवाभाव आज देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान असताना त्यांच्या अंत:करणाचा एक स्थायीभाव बनलेला आहे हे स्पष्टपणे दिसून येते.

महाराष्ट्राची संत परंपरा आणि तिचा अभ्यास श्री. मोदीजींनी अत्यंत श्रद्धेने केल्याची साक्ष त्यांच्या अनेक भाषणांमधून आपल्याला दिसून येते. जीवन खर्‍या अर्थाने सार्थकी लावायचे असेल तर ज्या गावात आपला जन्म झाला, ज्या राष्ट्रात आपण जन्माला आलो, ज्या समाजाने आपल्याला घरच्यांबरोबरच संस्कारित केले, सुख-दु:खाचा वाटेकरी म्हणून सहभाग दिला त्या जनतेच्या सेवेसाठी समर्पण वृत्तीची नितांत गरज आहे हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान मोदीजींनी आपल्या जीवनाची, सामाजिक सेवेची वर्षानुवर्षाची भूक भागवून घेतली. गेल्या आठ वर्षांपासून नेतृत्वाच्या माध्यमातून जनतेची सेवा करताना सेवेच्या माध्यमात फरक पडला असेल, पण सेवेचा भाव मात्र तिळमात्र कुठे बदलू शकला नाही. हे मोदीजींच्या जीवन वैशिष्ठ्याचे एक अनुपम उदाहरण आहे.

जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्राचाही त्यांनी बारकाईने अभ्यास केलेला आहे. देहू ते पंढरपूरपर्यंत शेकडो मैल पायी चालत जाऊन त्या विठ्ठलाच्या चरणांवर लोटांगण घालणे, चंद्रभागेचे स्नान करणे आणि नगरप्रदक्षिणेच्या माध्यमातून हा देह परमेश्वराला सेवार्थ समर्पित करणे ही वारकर्‍यांची निष्ठा मोदीजींच्या अंत:करणाचा एक भाव बनली असेल आणि म्हणून आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराजांच्या चरणांवर नतमस्तक होण्यासाठी मोदीजी यांचा हा दौरा असावा असा विश्वास वाटतो.

गेल्या आठ वर्षांपासून राष्ट्राच्या पंतप्रधानपदाच्या माध्यमातून जे सेवेचे इंद्रधनुष्य श्री. मोदीजींनी उचलले आहे ते भारताला स्वातंत्र्य मिळालेल्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होताना इतिहासाचे साक्षीदार बनत आहे. संसाराची आच नाही, स्वार्थाचा स्पर्श नाही आणि अहम्पणाचा वाराही कधी अंगावरून वाहत गेला नाही, अशा श्री. मोदीजींनी लाखो वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेल्या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी यावे हा एक अनन्यसाधारण योग आहे.

शुद्ध अंत:करण, शुद्ध भाव आणि याच प्रकाराने चारित्र्यसंपन्नतेची असलेली जोड ही मोदीजींच्या जीवनकार्याचा परिचय देणारी एक अनोखी बाब समजली पाहिजे. याच भावनेतून ते काशी विश्वेश्वराच्या चरणी लीन होतात, हिमालयातील शंकराचार्यांच्या भव्य मूर्तीचे अनावरण करतात, पंजाबमधील अमृतसर येथील गुरुद्वारात जाऊन नतमस्तक होतात, मुल्ला-मौलवींचा आदर-सत्कार करतात, जाती-पातीची बंधने तोडून राष्ट्रीय ऐक्याच्या भावनेने सद्गुणांच्या समोर ते सातत्याने नतमस्तक होतात, नम्र राहतात हा त्यांच्या जीवनातील संस्काराचा एक भाग आहे.

तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचे उदाहरण यानिमित्ताने आपल्याला पाहाता येईल…

येथे न सरे दुसरी आटी। देवा भेटी जावया॥१॥
तोचि एक ध्यावा चित्ते। करोनि रिते कलेवर॥२॥
षड्उर्मी हृदयांत। त्याचा अंत पुरवोनि॥३॥
तुका म्हणे खुंटे आस। तेणे वास करीतो॥४॥

या अभंगातून जगद्गुरू तुकाराम महाराज मार्गदर्शन करतात. देवाला भेटायला जायचे असेल तर दुसरी काही खटपट करण्याची गरज नाही. देह रिकामा करून चित्तात केवळ त्याचेच ध्यान असले पाहिजे. यापुढे या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या हृदयात जे षड्रिपु (ऊर्मी) आहेत त्यांचा नाश झाला पाहिजे. हे केव्हा शक्य आहे, ज्या ठिकाणी आशा खुंटल्या जातात, त्याच हृदयात भगवंत वास (निवास) करतात.

मोदीजींचे अंत:करण अत्यंत शुद्ध असून, संत तुकाराम महाराजांच्या चरणांवर येताना त्या शुद्ध अंत:करणात श्रद्धा, प्रेमभाव, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक भान या सद्गुणांसह ते महाराजांच्या चरणी नतमस्तक होतील, असा विश्वास आजपर्यंतच्या त्यांच्या राजकीय जीवनातील चरित्र पाहिले तर वाटल्याशिवाय राहणार नाही.

जे मागायचे आहे ते या देशातील १३० कोटी जनतेसाठी सुख मागायचे आहे. भारताच्या काही भागांवर काही दुष्टकर्म्यांनी जी वांझोटी युद्धक्रीडा आरंभली आहे, त्याचा नाश व्हावा हे मागणं मोदीजींना देहूच्या महात्म्यापाशी मागायचे असेल. गरिबाच्या झोपडीतील धूर घालवण्यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ घेऊन अथक परिश्रमाद्वारे ज्या अनेक योजना राबवल्या त्या योजना श्री. मोदीजींच्या राष्ट्रनिष्ठेचे बलस्थान मानावे लागेल. हे बलस्थान अधिक दृढ व्हावे हेच मागणे देहूच्या संतमहात्म्याच्या चरणांवर मोदीजी मागणार असतील.

तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे, ‘तोचि एक ध्यास चित्ते। करोनि रिते कलेवर॥’

आपल्या हृदयात भगवंताने निवास करावा आणि या राष्ट्राला सुख, संपन्नता, समृद्धी यावी, शत्रुपिडेचे उच्चाटन व्हावे याशिवाय हा व्रतस्थ राजकारणी अन्य काही मागेल असे वाटत नाही. काही दिवसांत या संत महात्म्याच्या पादुका लाखो वारकर्‍यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.

आपल्या आयुष्याचे इतिकर्तव्य साध्य करण्यासाठी निघालेल्या वारकर्‍यांना मोदीजींची ही भेट म्हणजे ‘शुभास्ते पंथान: सन्तु’ या निरोपाची असावी असे वाटते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये