ताज्या बातम्यारणधुमाळी

‘सरकारनं ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला…’- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : सुप्रीम कोर्टानं राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या असा आदेश निवडणूक आयोगाला दिला आहे. यावरुन भाजपनं महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारनं ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसलाय पण आम्ही त्यांना न्याय देऊ, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर ओबीसींचं राजकीय आरक्षण आम्ही देणार आहोत असं सरकारमधील मंडळी कायमच सांगत होती. पण हे सांगत असताना त्यांनी काम काही केलं नाही. दोन वर्षात एक कणभरही काम त्यांनी केलेलं नाही. कोर्टानं त्यांना ट्रिपल टेस्ट करायला सांगितली होती. यातील पहिला मुद्दा डेडिकेटेड वेगळा आयोग वापरा असा होता पण तो काल-परवा सरकारनं तयार केला. दुसरा मुद्दा इम्पिरिकल डाटा गोळा करावा हा होता पण त्याचाही अद्याप पत्ता नाही. त्यामुळं कोर्टानं आज वैतागून निर्णय दिला की, येत्या आठवड्याभरात महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात यावीत. ही सरकारनं ओबीसींची केलेली प्रचंड मोठी फसवणूक आहे. सरकारनं ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. हे सरकार त्यासाठीच प्रसिद्ध आहे.

सुप्रीम कोर्टानं सरकारला या विषयावर जेवढं ऐकवायचं तेवढं ऐकवलं आहे. फक्त प्रशासक नेमायचा आणि त्या माध्यमातून पालकमंत्र्यानी संबंधीत महानगरपालिका चालवायची. यामुळं ओबीसींचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र भाजप या सर्व जागांवर ओबीसी उमेदवार देणार. भाजपचं सर्व समाजात काम आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण सरकारच्या नाकर्तेपणामुळं गेलं आम्ही मात्र त्यांना न्याय देणार, असंही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये