पाकिस्तानच्या बाबर आझमने मोडला विराट कोहलीचा विक्रम

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आपल्या फलंदाजीच्या कौशल्याने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याला ‘पाकचा विराट कोहली’ म्हटले जाते, परंतु २७ वर्षीय पाक फलंदाजाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा करणार्या कर्णधारांच्या यादीत माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे.
नवी दिल्ली : उजव्या हाताचा फलंदाज बाबर आझम (१०३) याने बुधवारी रात्री वेस्ट इंडिजविरुद्ध आपले १७ वे शतक झळकावले. त्याच्या खेळीमुळे पाकिस्तानने वेस्ट इंडिजवर ५ विकेट्सने रोमहर्षक विजय नोंदवला. या विजयासह पाकिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर शे होपच्या शतकाच्या जोरावर ३०५ धावा केल्या, ही धावसंख्या पाकिस्तानने ४ चेंडू राखून पूर्ण केली.
मुलतानमध्ये १४ वर्षांनंतर या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. बाबर आझमने आपल्या चाहत्यांना शतकाची भेट दिली. यापूर्वी या मैदानावर २००८ मध्ये बांगलादेशने यजमानपद भूषवले होते.
या खेळीसह पाकिस्तानच्या कर्णधाराने एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून १००० धावाही पूर्ण केल्या आहेत. हा आकडा गाठण्यासाठी बाबरला १३ डाव लागले आणि तो जागतिक क्रिकेटमधील सर्वात वेगवान कर्णधार ठरला आहे. याआधी हा विक्रम भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर होता, ज्याने कर्णधार म्हणून १७ डावांमध्ये सर्वात जलद १००० धावा केल्या होत्या.
बाबरने वनडेत दुसर्यांदा शतकांची हॅट्ट्रिक केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचे हे सलग तिसरे शतक आहे. पाकिस्तानच्या कर्णधाराने वेस्ट इंडिजविरुद्ध ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॅक टू बॅक शतके झळकावली होती. त्याने २०१६ मध्ये शतकांची हॅट्ट्रिक केली होती.