बालगंधर्व मोहोत्सव विशेष- “बिग बॉसने जीवनातील प्रेम शिकवले आणि व्यवहारही”: अभिजित बिचुकले

बिग बॉसच्या अनुभवांबद्दल रंगला अनोखा परिसंवाद
बिग बॉसच्या घरातील दुनियेमध्ये वावरत असताना आमच्यात अशा प्रतिमा बाहेर दिसल्या, तशात खचितच नसून त्यापेक्षा बरेच वेगळे जग आहे, असे सांगत बिग बॉसचा सहजजीवनामध्ये आम्हाला खरे प्रेम शिकवले आणि लोकव्यवहारदेखील शिकवला, असा सूर बिग बॉसच्या गमतीजमती या परिसंवादामध्ये व्यक्त झाल्या.
बालगंधर्व महोत्सवाच्या रंगमंचावर बिग बॉसच्या गमतीजमती या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जितेंद्र वाईकर आणि अश्विनी धायगुडे-कोळेकर यांनी बिग बॉसमधील कलाकारांना बोलते केले. अनेक अनुभव, किस्से, धमाल आणि जीवनातील तत्त्वज्ञान सांगणारा हा परिसंवाद तब्बल दोन तासांपर्यंत रंगला. या परिसंवादामध्ये सुरेखा कुडची, नेहा शितोळे, डॉ. उत्कर्ष शिंदे, अक्षय वाघमारे, अभिजित बिचुकले, मीरा जगन्नाथ, तृप्ती देसाई, सोनाली पाटील, माधव देवचक्के यांनी सहभाग घेतला. यावेळी अक्षय वाघमारे म्हणाला की, मला मुखवटा लावून राहता अाले नाही. कारण मी आहे तसाच तिथेही प्रेझेंट झालो, म्हणूनच कदाचित मला महेश जंटलमन म्हणाले होते.
उत्कर्ष म्हणाला की, मी बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणाऱ्यापैकी आहे. त्याचा अनुभव प्रेक्षकांनाही तिथे आला असणारच. त्यामुळेच मला महेश सरांनी अनेक विशेषणे लावली होती.
मीरा जगन्नाथ म्हणाली, की माणसामध्ये चांगल्या गोष्टीही असतात आणि वाईटही. परिस्थितीप्रमाणे आपण व्यक्त होतो. चांगले-वाईट असे काही नाही, नुसती माणसं परिस्थितीप्रमाणे वागतात.
नेहा शितोळे म्हणाली की, मी बिग बॉसच्या घरात जाताना काही गोष्टी अगदी पक्क्या ठरवून गेले होते. तिथे मला खूप काही शिकायला तर मिळालेच, पण सोबतच चांगले मित्रदेखील मिळाले. तिथे अनेकांशी मतभेद झाले, पण ते केवळ त्या घरापुरतेच राहिले.
सुरेखा कुडची म्हणाल्या की, चॅनल त्यांना जे दाखवायचं आहे तेच प्रेक्षकांना दाखवत असते. पण सत्य परिस्थिती ही खूप वेगळी असते. त्यामुळे आम्ही तिथे भांडलो असलो तरी आम्ही एकमेकांची खूप काळजीदेखील केली.
तृप्ती देसाई म्हणाल्या की, बिग बॉसमध्ये जाण्याआधी मला अनेकांनी सांगितलं होतं, की आपली प्रतिमा मलिन होईल. पण बिगबॉसच्या घरात मला पहिल्यांदाच लोकांनी इतकं हसताना पाहिलं असेल. भिडणारी तृप्ती सगळ्यांनी पाहिली होती, पण भावनिक तृप्ती बिगबॉसमुळे लोकांना कळली.
माधव देवचक्के म्हणाला की, बिगबॉसने आम्हाला कुठे बोलायचं, यापेक्षा गप्प कधी बसायचं हे शिकवलं.
अभिजित बिचुकले यांनी नेहमीप्रमाणेच बॅटिंग करत थेट बालगंधर्वच्या मुद्द्याला हात घातला आणि हे रंगमंदिर अजिबात पाडू नये, अशी विनंती केली. यावेळी सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या प्रश्नालादेखील उत्तरे दिली.