पोलीस म्हणतात पूजा चव्हाणचा मृत्यू अपघाती

पुणे : पूजा चव्हाण प्रकरणी अडचणीत आलेले शिवसेना आमदार संजय राठोड यांच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारी 2021 रोजी पुण्याच्या वानवडी परिसरातील इमारतीच्या बाल्कनीतून उडी घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर या प्रकरणाची विविध स्तरावर चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी काही व्हिडीओ क्लिप देखील व्हायरल झाल्या होत्या. यामध्ये या प्रकरणात संजय राठोड असल्याची माहिती समोर आली होती. यामुळे त्यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आता पुणे पोलिसांकडून त्यांना या प्रकरणी क्लीन चिट दिली आहे.
पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण हिची आत्महत्या झाल्याचे सांगत राठोड यांना या प्रकरणातून दोषमुक्त केले आहे. तसंच याप्रकरणी शनिवारी बंजारा समाजाचे महंतानी पुण्याच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी या प्रकरणी जो तपास करण्यात आला त्याचा अहवाल द्या अशी मागणी करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांकडून या प्रकरणी काही कागदपत्रे या शिष्टमंडळाला देण्यात आली. त्या कागदपत्रांमध्ये पूजा हिचा मृत्यू अपघाती असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, या शिष्टमंडळमध्ये पोहरादेवीचे 6 महंत बाबू सिंह महाराज, कबीरदास महाराज, सुनील महाराज ,जीतू महाराज, यशवंत महाराज, शेखर महाराज,आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष शंकर पवार यांचा समावेश होता. आता संजय राठोड यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर त्याचं मंत्रिमंडळातील पद पुन्हा मिळणार की नाही याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.