आमदार भाऊ शिंदे गटात, बहीण ठाकरेंसोबत, रक्षाबंधनाला राजकीय मतभेद बाजूला

जळगाव : (Kishor Patil On Uddhav Thackeray) रक्षाबंधनाचा हा सण भावा-बहिणींच्या नात्यातील सर्वात पवित्र समजला जातो. एरवी कितीही हेवेदावे असले, तरी या निमित्ताने ते बाजूला ठेवून नात्याला पुन्हा उजाळा देण्याचे काम करत असतो. त्याचा परिचय राजकारणातही येताना दिसत आहे. जळगावचे बंडखोर आमदार किशोर पाटील हे शिंदे गटात आहेत, तर त्यांच्या चुलत बहिण वैशाली सुर्यवंशी या शिवसेनेसोबत आहेत. मात्र या दोघांची राजकीय वाटा जरी वेगवेगळ्या असल्या तरी, रक्षाबंधन सणाच्या दिवशी भाऊ-बहिणीचे नाते त्यांनी जपल्याचे पहायला मिळत आहे.
दरम्यान, बहीण वैशाली सुर्यवंशी यांनी भाऊ किशोर पाटील यांच्या निवासस्थानी जात त्यांना राखी बांधल्याचे पाहायला मिळाले आहे. पाटील यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. तर त्यांचे काका आर. ओ. तात्या यांची कन्या वैशाली सुर्यवंशी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी निष्ठा कायम राखत त्यांना समर्थन दिलं आहे.
बहीण वैशाली सुर्यवंशी यांनी भाऊ किशोर पाटील यांना पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले, तर भाऊ आमदार किशोर पाटील यांनीही बहिणी वैशाली यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याचं यावेळी पहायला मिळाले. याआधी, डंके की चोट पे सांगतो. पुन्हा आमदार म्हणून निवडून येईल आणि हॅट्रीक करेन, या शब्दात शिंदे गटाचे बंडखोर आमदार किशोर पाटील यांनी खुलं आव्हान शिवसेना समर्थकांना दिलं आहे.