अग्रलेखराष्ट्रसंचार कनेक्टसंडे फिचर

बुरखा फाडणारा जोष!

चार दिवसांपूर्वी केंद्रीयमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाहत्या’ मानल्या जाणाऱ्या नेत्या स्मृती इराणी तावातावाने संसदेत बोलताना दिसल्या. ताणलेल्या शिरा डोळ्यातून व्यक्त होणारा राग नळावरच्या भांडणासारखे चाललेले हातवारे आणि एकूणच शब्दा-शब्दातून व्यक्त होणारा प्रचंड संताप हा सोनिया गांधी यांच्यावर बरसत होता. या देशातील सर्वसामान्य माणसाला ते चित्र पाहून राग आला का? राष्ट्रपतीला राष्ट्रपत्नी म्हणणे हा काँग्रेसनेत्याचा दोष जरी असला आणि त्यावर हरकत उपस्थित करणे हे स्वाभाविक जरी असले तरी स्मृती इराणी यांचा हा एकूण आवेश आणि संतापाच्या लाटा या काही फार प्रसन्न चित्र दाखविणाऱ्या नव्हत्या.

त्याच्या आधी २४ तासच स्मृती इराणीच्या कन्या यांनी गोव्यामधील रेस्टॉरंट अँड बार असल्याच्या मुलाखती दिल्या होत्या आणि तो बेकायदेशीर बार चालवत असल्याचा बोभाटा माध्यमांमधून झाला होता, त्याचाच एक प्रकारचा राग म्हणून इराणी यांचा सोनिया गांधी यांच्यावर कहर बरसला आणि त्यांना निमित्त मिळाले ते राष्ट्रपतींच्या अपमानाचे !
त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी नॅशनल हेरॉल्डप्रकरणी ईडीने भावनांवर छापा मारला आणि ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना चौकशीसाठी पाचारण केले, हा सगळा योगायोग नाही.

कुठेतरी आपली बाजू कमकुवत होत असताना दिसली, की सुरक्षा यंत्रणांचा आणि चौकशी यंत्रणांचा उपयोग करून काँग्रेसवर किंवा राज्या-राज्यांत विरोधकांवर घाव घालायचे, ही भाजपची रणनीती आहे. वाढणारी महागाई हे सध्या मोदी सरकारच्या अपयशाचे प्रमुख कारण आहे आणि सामान्य लोकांच्या मनामध्ये तो राग आहे. ‘ ना भ्रष्टाचार करेंगे ना करने देंगे’ हा नारासुद्धा आता कुठेतरी विरत चालला आहे आणि भाजपचे सगेेसोयरे, मंत्री, खासदार भ्रष्टाचारात कसे बुडालेले आहेत, याच्या सुरस कहाण्या बाहेर येत आहेत.

कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचाराच्याविरोधात ठाम भूमिका घेणारे असतीलही, परंतु ते या सर्वांवर अंकुश ठेवू शकत नाहीत, ते आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हादेखील राग आता सामान्य माणसाच्या मनात आहे. मोदी यांचा आज करिष्मा जरी असला तरी आजपासून पाच वर्षांपूर्वी जो होता तो आज नाही, हेदेखील तितकेच सत्य आहे. कुठेतरी घसरत चाललेली ही लोकप्रियता टिकवून ठेवायची किंवा विस्तारित करायची यासाठी पहिल्यांदा विरोधकांच्या गोटात अस्वस्थता माजवली पाहिजे किंवा त्यांच्यावर शरसंधान केले पाहिजे, ही राजकीय नीती मोदी सरकारने प्रथमपासूनच अवलंबलेली आहे . त्याचाच हा सारा परिपाक आहे.

काँग्रेस आजही आठ राज्यांमध्ये आहे. तो पूर्णपणे संपलेला पक्ष नाही. छत्तीसगड, पंजाब, राजस्थान या राज्यांतील पूर्ण सरकारांसोबत झारखंड, पाँडिचरी, महाराष्ट्र (मागील महिन्यापर्यंत) अशा राज्यात ही काँग्रेसची सरकार आहे… काँग्रेस हा पक्ष आता कमजोर होत आहे, असे सांगितले जात असले तरीही अस्तित्वही नाही. या पक्षाला दिशा देणारे नेतृत्व आणि तो आक्रमकपणा राहिला नाही, हे वास्तव असल्यामुळे आज हा आवाज क्षीण झाला आहे.
काल पहिल्यांदाच वाढत्या दरवाढीच्या विरोधामध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी या तिघांनी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने केली. त्यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रत्येक प्रदेश काँग्रेस कार्यालयाने आंदोलने केली. अगदी शहराध्यक्ष – जिल्हाध्यक्षसुद्धा रस्त्यावर उतरले.

एक प्रकारचे जोषपूर्ण वातावरण काल दिवसभर होते. त्यामुळे मोदी सरकारच्याविरोधात एक प्रकारे जनाक्रोश रस्त्यावर दिसून आला. हे आंदोलन दरवाढीविरोधात करता होते आणि त्यामुळे दरवाढीमुळे चिंताक्रांत असलेला प्रत्येक सामान्य माणूस या आंदोलनाच्या पाठीमागे होता. तो जरी रस्त्यावर उतरला नसला तरीदेखील चाललेली आंदोलन ही योग्य आहेत, हा भाव मात्र प्रत्येक माणसाच्या मनात होता आणि हेच कालच्या आंदोलनाचे किंवा काँग्रेसच्या पुनर्जीवनाचे एक प्रकारे सुचिन्ह मानले पाहिजे. फक्त हा आवेश आता कायम ठेवत रस्त्यावरची लढाई काँग्रेसने लढली पाहिजे.

‘२०२२ मध्ये प्रत्येक सामान्य माणसाच्या हक्काचे घर असेल ‘ अशा आशयाचे भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. सध्या तेच भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे… अनेक योजना या फसव्या निघाल्या , किंबहुना अनेक योजना पूर्णत्वास जाऊ शकल्या नाहीत. हेदेखील मोदी सरकारचे एक अपयश आहे. आता प्रसारमाध्यमे, त्यावरील कमांड, मोठ्या प्रमाणात असलेला आवाज आणि सर्व आयुधांचे प्रचार – प्रसाराचा योग्य वापर त्यामुळे कदाचित हे फार पुढे येऊ शकत नाही. परंतु मोदी सरकारचे अपयश हे पूर्णतः झाकण्यासारखे नाही. हे मात्र या जनतेला आता कळत आहे.

जरूर त्यांच्या कार्यकाळामध्ये काश्मीर , अयोध्या , परराष्ट्रनीती यासारखे चांगले निर्णय झाले की, त्याच्या पाठीमागे देश उभा राहिला. परंतु महागाई , ढासळत चाललेली आर्थिक पत, बँकांमधील गैरव्यवहार आणि आता नव्याने घातलेला खासगीकरणाचा डाव, अदानी-अंबानी यांचे लाड, हेदेखील सामान्य माणूस बारकाईने बघत आहे.
सामान्य माणसाची निरीक्षणशक्ती आणि निर्णय क्षमता ही अशाच प्रकारे सुप्त आणि निद्रिस्त प्रमाणात जागृत असते. ती रोज रस्त्यावर उतरून आंदोलने करत नाही . परंतु ती शक्ती मतदानातून नक्कीच बाहेर पडेल . सातत्याने फक्त करिष्माच्या नावाखाली पुढे रेटायचे, हा देखील भाव आणि आव आता जनता ओळखत आहे.

‘इडी’ चा गैरवापर
‘अति तेथे माती’ अशी म्हण आहे . सक्तवसुली संचलनालय , सीबीआय या यंत्रणा केंद्र सरकारच्या निर्देशावर काम करीत नाहीत, हा आता एक चक्क भाबडेपणा आहे . कुठल्याही लहान पोरालाही समजू शकेल इतक्या उघडपणे या यंत्रणांचा वापर केला जात आहे . वर्षानुवर्षे जे प्रकरण पाहिले गेले नाही त्याकडे ईडीचे लोक जातात. त्या त्या चौकशांचा ससेमिरा सुरू होतो.भारतीय जनता पक्षाच्या बाजूला जे येऊन बसले आहेत, त्यांना ईडी धक्काही लावत नाही व समोरच्यावर रात्री-अपरात्री छापे टाकण्यापासून ते अटक करेपर्यंत कार्यक्रम चालतो. हे खरे तर खूप अति होत आहे .

संजय राऊत यांना अटक करण्याबद्दल व्यक्तिशः लोकांना काही राग नाही. संजय राऊत यांची बेताल वक्तव्ये आणि त्यांच्या संपत्ती, पत्राचाळमध्ये त्यांचा दोष हे सर्वश्रुत आहे . त्याबद्दल लोकांचं म्हणणं काहीच नाही; परंतु आपल्या समोरच्याचा आवाज दाबून टाकण्यासाठी ईडीचा असा बेमालूमपणे वापर करणे , आपल्या सोयीच्या वेळेप्रमाणे ही व्यवस्था आपल्या राजकीय सोयीसाठी वापरणे , हे देशाच्या हिताचे नाही . हे देखील सामान्य माणसाला आता समजून चुकले आहे.

सध्या सत्ता मिळवण्याच्या आणि ती राखण्याच्या कैफामध्ये भाजप आहे . मोदी – शहा करिष्मा पुढे सर्व त्यांना फिके दिसत आहे. सामान्यांच्या मतांना, मनाला हे न पटणारे चालले आहे . ही कदाचित मोदी-शहा आणि भाजपाच्या भाजपाच्या ऱ्हासाची नांदी ठरू शकते. कालच्याप्रमाणे सामान्य माणसाचा आवाज रस्त्यावर मांडला त्याप्रमाणे काँग्रेसने जर आता झुंज दिली तर नक्कीच हा बुरखा फाटल्याशिवाय राहणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये