नात्यात ओलावा, आघाडीत दुरावा; पवार भेट काँग्रेस-ठाकरेंना रुचेना

पुणे | Maharashtra Politics – अजित पवार (Ajit Pawar) मला पुतण्या म्हणून भेटला, त्यात गैर काय? असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केल्यावरही शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस पक्षांना तो रुचलेला नाही. या दोघांनी मिळून शरद पवार यांनाच चार शब्द ऐकवले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे दोघेजण एका उद्योगपतीच्या घरी शनिवारी भेटले. ही गुप्त भेट चांगलीच वादग्रस्त झाली. सोलापूर भेटीत पत्रकारांशी बोलताना, दोन विषयांवर त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. भाजपबरोबर जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले अाणि अजित पवार माझा पुतण्या आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. तरीही पवारांविषयी जनतेतील संभ्रम दूर झाला नाही. पुतण्याला भेटायचे होते, तर उघडपणे भेटता आले असते.
गेल्या दोन महिन्यांत काका-पुतण्या वारंवार का भेटत आहेत? काही राजकीय विश्लेषकांच्या मते, मोदी, शहा आणि पवार यांची तर ही योजना नाही, की हळूहळू अजित पवार यांच्या माध्यमातून सगळा पक्ष भाजपच्या मदतीला पाठवून द्यायचा आणि स्वतंत्र राहून पवार यांनी आपले पुरोगामित्व जपायचे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या मते केंद्रात कृषिमंत्रिपद आणि नीती आयोगाचे अध्यक्षपद अशा दोन ऑफर्स केंद्राने पवारांना दिल्या का, याविषयी संभ्रम स्पष्टपणे दूर व्हायला हवा. पवारांच्या मागण्या मोठ्या आहेत का? त्याला मोदी, शहा प्रतिसाद देत नाहीत का? आणि ही निरोपानिरोपी अजित पवारांच्या मध्यस्थीने चालू आहे का, असेही बोलले जाते.
शिवसेनेचे (उबाठा) प्रवक्ते संजय राऊत स्पष्टपणे म्हणाले की, तुम्ही नातीगोती सांभाळायची आणि कार्यकर्त्यांना लढायचे, अशा वागण्याचा डीएनए शिवसेनेत (उबाठा) नाही. आमच्याशी बेईमान झालेले एकनाथ शिंदे माझे मित्र आहेत. अनेकवेळा माझ्या घरी आलेले आहेत. पण, आता बदललेल्या राजकारणात आम्ही दोघांनी चहा पित बसणं बरोबर आहे का? राजकारणात काळवेळ बघून वागावे लागते. आपल्यासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना आम्ही काय संदेश देत आहोत ते महत्वाचे आहे. काँग्रेस, शिवसेना (उबाठा) तून आलेल्या या सगळ्या प्रतिक्रिया पाहता, हे राजकारण सहजासहजी मिटेल, असे दिसत नाही.