मथुरामध्ये ट्रेनचा भीषण अपघात; ट्रेन रूळ सोडून प्लॅटफॉर्मवर चढली अन्…

Mathura Train Accident | उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मथुरामध्ये (Mathura) ट्रेनचा मोठा अपघात (Train Accident) झाला आहे. ट्रेन रूळ सोडून प्लॅटफोर्मवर चढली अन् भीषण अपघात झाला. मात्र, सुदैवानं या ट्रेनमध्ये प्रवासी उपस्थित नव्हते त्यामुळे मोठी जीवीतहानी टळली आहे. ट्रेनच्या या अपघातानंतर रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ उडाला होता. तसंच प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण देखील निर्माण झालं होतं. तर आता या अपघाताचा रेल्वे प्रशासनाकडून तपास केला जात आहे.
मथुरा जंक्शनवर रात्री हा ट्रेन अपघात झाला. शकूर बस्तीकडून येणारी ईएमयू ट्रेन (EMU Train) मथुरा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर चढली. तर सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र, या अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
रेल्वे प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, शकूर बस्ती येथून ट्रेन 10.49 ला आली होती. त्यावेळी सर्व प्रवासी ट्रेनमधून उतरले होते. त्यानंतर ही ट्रेन रूळ सोडून प्लॅटफॉर्मवर गेल्यामुळे हा अपघात घडला. तर सध्या ट्रेन प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचं काम सुरू आहे. तसंच ट्रेन प्लॅटफॉर्मवरून हटवल्यानंतर अप मार्गावरील सर्व गाड्या पुन्हा सुरू केल्या जाणार आहेत.