बर्फाचा गोळा जीवघेणा ठरू शकतो

सावध राहण्याचा अन्न-औषध प्रशासनाचा इशारा
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर थंड पदार्थांची मागणी वाढते. त्यावेळी बर्फासारख्या पदार्थाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. भेसळयुक्त बर्फ असण्याची शक्यता असल्याने बर्फ किंवा शीतपेयांची तपासणी करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने व्यापक मोहीम राबविणे आवश्यक आहे, असे औरंगाबदच्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी सांगितले आहे.
औरंगाबाद : मनुष्यबळाच्या अभावाने फक्त बर्फ कारखान्यात नमुने घेतले जातात. प्रत्यक्षात शीतपदार्थ विक्रेत्यांकडे वापरण्यात येणारे बर्फ खाद्य आहे किंवा अखाद्य याची पडताळणीच होत नाही. तहान भागविण्यासाठी सरबत, लस्सी, बर्फगोळा, नीरा, ताक, ज्यूस, आईस्क्रिम, कोल्ड्रिंक्सचे सेवन केले जाते. खाण्याचा बर्फ किंवा कच्चा माल आणि तयार अन्नपदार्थाच्या दर्जाची खात्री करणे आवश्यक आहे.
बर्फाचे उत्पादन करताना खाद्य दर्जाचा बर्फ हा पिण्यायोग्य पाण्यापासून तयार करण्यात यावा; तो रंगहीन असावा. अखाद्य बर्फात खाद्योपयोगासाठी वापरण्यात येणारा रंग इंडिगो कॅरमाइन किंवा ब्रिलियंट ब्लू एफसीएफ रंग अत्यल्प प्रमाणात निळसर रंगाची छटा निर्माण होईल, एवढा किमान १० पीपीएम खाद्यरंग असला पाहिजे.
मात्र या निर्देशांकडे फारसे लक्ष कोणी देताना दिसत नाही. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न होऊ शकतो. अशुद्ध पाण्याच्या बर्फाने आजाराला निमंत्रण यामुळे घसा दुखणे, डायरिया, उलट्या, दीर्घकालीन खोकला, सर्दी असे त्रास होऊ शकतात. तसेच पचनसंस्थेशी संबंधित अडचणींनादेखील सामोरे जावे लागू शकते. यामुळे शीतपदार्थ खरेदी करताना बर्फ शुद्ध पाण्याचा आहे काय, हे पडताळणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यामध्ये बर्फाचा गोळा खाल्ल्याने अनेकदा लहान मुलांमध्ये श्वसनाचे अथवा घशाचे विकार निर्माण झाल्याचे दिसून येते. सुरुवातीला लहानसा वाटणारा खोकल्याचा आजार भविष्यात उग्र रुप धारण करू शकत असल्याने पालकांनी प्रामुख्याने लहान मुलांना बर्फगोळ्याच्या मोहापासून दूर न्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.