बाबो! फोटो काढा अन् व्हा मालामाल; नितीन गडकरींची मोठी घोषणा!

मुंबई | Nitin Gadkari’s Big Announcement – केंद्रिय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाडीचा फोटो पाठवा आणि ५०० रुपये मिळवा अशी घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे. यासाठी लवकरच कायदा आणण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. नितीन गडकरी यांनी दिल्लीतील डीकार्बनायझेशन समिट या कार्यक्रमात बोलताना ही घोषणा केली आहे.
आपल्या देशात अनेक शहरांमध्ये कार पार्किंगविषयी नागरिकांना शिस्त नसल्याचं वेळोवेळी दिसून येतंय. मिळेल त्या ठिकाणी गाडी पार्क करण्याकडे लोकांचा कल असतो. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून आता अशा प्रवृत्तीविरोधात नवीन कायदा आणण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं आहे.
“जो व्यक्ती चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर गाडी उभी करेल त्याला १००० रुपये दंड लावण्यात येईल. त्याचवेळी त्या गाडीचा फोटो काढून पाठवणाऱ्या व्यक्तीला ५०० रुपयांचे बक्षिस देण्यात येईल”, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.