“वरळीच्या आमदारांना तर पेग, पेंग्वीन अन् पार्टी…”, आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका

मुंबई | Ashish Shelar On Aditya Thackeray – भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी वरळीचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. दिवाळी निमित्त मुंबईत होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देण्याकरिता आशिष शेलार यांनी आज (20 ऑक्टोबर) पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमावरून आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
“वरळीच्या मैदानावर आम्ही अतिक्रम केल्याचा आरोप होतो आहे. मात्र, यात अतिक्रमणाचा कोणताही संबंध नाही. मुंबईकरांच्या मनात काय आहे, हे आम्हाला माहिती आहे. त्यांच्याशी आमची नाळ जुळली आहे. विशेषत: वरळीच्या आमदारांना तर पेग, पेंग्वीन आणि पार्टी यापुढे काहीही दिसत नाही”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. तसंच आदित्य ठाकरेंनी आजपर्यंत वरळीत मराठी साहित्य, खेळ, लोककला याचा एकही कार्यक्रम आयोजित केला नाही. त्यामुळे त्यांनी आमच्याबद्दल बोलूच नये, असंही ते म्हणाले.
“जे दुसऱ्यांवर जळत राहतात, ते आनंदाचे दिवे लावू शकत नाहीत. त्यामुळे दुसऱ्याच्या अपयशावर ते सतत बोलत असतात आणि वर्तमान पत्रातून लिहित असतात. ते मुंबईत दिवे लावण्याच्या प्रकाश उत्सवाच्या कार्यक्रमात कुठे दिसत नाही”, असा खोचक टोलाही आशिष शेलारांनी ठाकरे गटाला लगावला आहे.