“5 सप्टेंबरला अग्रवाल पंतप्रधान मोदींना भेटले आणि त्यानंतर…”, रोहित पवारांचं वक्तव्य!

मुंबई | Rohit Pawar On PM Narendra Modi – वेदांता-फाॅक्सकाॅन (Vedanta-Foxconn) प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यामध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकल्पावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जातंय. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी रोहित पवार म्हणाले, “महाविकास आघाडीच्या काळात सगळ्या गोष्टी अंतिम झाल्या होत्या. टॅक्स बेनिफिट, जागेची किंमत आणि इतर सर्व गोष्टी अंतिम झालेल्या असताना, सरकार बदललं. कदाचित या सरकारने देखील प्रयत्न केलेले असावेत, पण 5 सप्टेंबर रोजी जेव्हा अग्रवाल हे पंतप्रधानांना भेटले आणि त्यानंतर सगळ्याच गोष्टी बदलायला सुरुवात झाली.”
“फाॅक्सकाॅन प्रकल्पामधून महाराष्ट्रामधील दीड लाख युवकांना नोकरी मिळाली असती. परंतु हा प्रोजेक्ट गुजरातला गेला. महाराष्ट्रात तळेगावला जागा निश्चित झाली होती, परंतु आता गुजरातमध्ये ते जागा शोधत आहेत. म्हणजे इथं ताट वाढलं होतं आणि गुजरातमध्ये आता त्यांनी जेवण तयार करण्याची सुरूवात केली आहे, लाकडं गोळा करत आहेत. म्हणजे जर त्यांना जमीन अद्याप तिथे मिळालेली नसेल आणि असे दोन-तीन प्रोजेक्ट गुजरातमध्ये आले होते. परंतु ज्या जमिनी आता फॉक्सकॉनला दिल्या गेल्या त्या जमिनी त्यांना देऊ केल्या होत्या, परंतु त्यांनी ती जागा घेतली नाही व ते प्रोजेक्ट आता गुजरातला राहिले नाहीत. त्यामुळे फॉक्सकॉनचं जर अद्याप गुजरातमध्ये काही निश्चित झालेलं नसेल, तर तो संपूर्ण प्रोजेक्ट महाराष्ट्रात कसा येईल यासाठी आताच्या सरकारमधील नेत्यांनी प्रयत्न करावेत.” असा सल्ला देखील रोहित पवार यांनी दिला आहे.