ताज्या बातम्यापुणेमनोरंजन

पुण्याच्या मंजुश्री ओकची ‘गिनीज बुक’मध्ये नोंद; 121 भाषांमध्ये 121 गाण्यांचे सलग साडेतेरा तास सादरीकरण

पुणे | ‘विविधतेतील एकात्मकते’चे दर्शन घडवून गायिका मंजुश्री ओक यांनी भारतातील तब्बल 121 भाषा, बोलीभाषा आणि उपभाषांमध्ये सलग साडेतेरा तास 121 गाण्यांचे सादरीकरण केलेल्या विक्रमाची ‘ गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नोंद झाली आहे. या विक्रमासाठी त्यांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे 10 ऑक्टोबर, 2019 रोजी झालेल्या ‘अमृतवाणी-अनेकता मैं एकता’ या कार्यक्रमात ही गीते सादर केली होती. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् यांच्याकडून हा विक्रम पूर्ण झाल्याचे त्यांना नुकतेच कळविण्यात आले आहे.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ओक यांनी यापूर्वी 2017 आणि 2018 अशी सलग दोन वर्षे ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ व ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये प्रत्येकी दोन विक्रम नोंदविले आहेत. ‘लहानपणापासून अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असताना संगीत क्षेत्रातील प्रयत्नांद्वारे देशासाठी काही तरी योगदान द्यावे, हा विचार मनात होता. याच दृष्टीने प्रयत्न करीत असताना ‘श्री यशलक्ष्मी आर्ट’तर्फे आणि पद्मनाभ ठकार यांच्या सहकार्याने ‘अमृतवाणी – अनेकता मैं एकता’ हा कार्यक्रम केला,’ असे ओक यांनी यावेळी सांगितले.

गाण्यांमध्ये पारंपरिक गीते, लोकगीते, भक्तिगीते, भावगीते, अभंग, देशभक्तिपर गीते; तसेच लावणीला सामावून घेतले. देशातील ही विविधता भाषा आणि गाण्यांच्या स्वरूपात जगापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने मी हा विक्रम करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरला,’ अशी भावना ओक यांनी व्यक्त केली.


Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये