‘३६ गुण’ जुळणार? चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एकापाठोपाठ एक सामाजिक, कौटुंबिक परिवर्तन घडवणारे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तसेच ऐतिहासिक वारसा युवा पिढीला समजला पाहिजे यासाठी देखील चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तर लग्न ही आयुष्यातील अत्यंत हळूवार आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. लग्नामुळे दोन मनांसह दोन कुटुंबे नात्यामध्ये बांधली जातात.
तर लग्न ठरवण्याच्या वेळी दोन्ही व्यक्तींची कुंडली बघितली जाते. यात एकमेकांची मतं जुळणं महत्त्वाचं असतं हा विचार घेऊन दिग्दर्शक समित कक्कड यांचा ‘३६ गुण’ या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. तर हा चित्रपट येणाऱ्या ४ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
तसेच अभिनेता संतोष जुवेकर याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेयर करत म्हटले की, आला आला teaser आला!! लवकरात- लवकर तो आपल्या मित्र- मैत्रिणींना शेयर करा हा, संत्याचा आदेश आहे असं म्हणत त्याने कुंडली नाही, मनं जुळावी लागतात! ३६ गुण हा चित्रपट येतोय लवकरच ४ नोव्हेंबरला आपल्या भेटीला असं पोस्टमध्ये म्हटले आहे.
याचप्रमाणे या चित्रपटाच्या टीझरवरून सांगायचं झालं तर त्यामध्ये आपल्या मनाचा आणि मताचा विचार न करता फक्त अपेक्षा करत लग्न करणाऱ्या सुधीर आणि क्रियाला मधुचंद्रापासूनच एकमेकांच्या उणिवा जाणवू लागतात. यातूनच त्यांच्यात खटके उडू लागतात. नेमकं काय चूक, काय बरोबर, या दुहेरी मनःस्थितीत त्यांचं नातं कोणतं वळण घेतं, हे या ‘३६ गुण’ चित्रपटाच्या टीझरमधून पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या चित्रपटात संतोष जुवेकर आणि अभिनेत्री पूर्वा पवार हे मुख्य भूमिका साकारणार असून या चित्रपटात पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकार सुद्धा दिसणार आहेत. तर कोणतीच नाती आशा-अपेक्षांच्या व्यापारात गोवली जाऊ नयेत. लग्न करणाऱ्या दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन, प्रत्येक बाबतीत एकमेकांना साथ देणे अतिशय गरजेचे आहे हे प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
‘द प्रॉडक्शन हेडक्वार्टर्स लि’ व ‘समित कक्कड फिल्म्स निर्मित ‘३६ गुण’ चित्रपटाची निर्मिती मोहन नाडार, समित कक्कड, संतोष जुवेकर आणि सावित्री विनोद गायकवाड यांनी केली आहे. तसेच चित्रपटाची कथा, पटकथा समित कक्कड आणि हृषिकेश कोळी यांची आहे. यामुळे प्रेक्षकांना देखील या चित्रपटाची ओढ लागली आहे.