संमेलनाचा सांगावा

डॉ. शमसुद्दीन तांबोळी
प्रसिद्ध लेखक
साहित्य संमेलनामध्ये टीव्हीवर सातत्यानं दाखवले जाणारे कार्यक्रम घेण्याचं प्रयोजन आहे का, यावर खरोखर विचार होणं गरजेचं आहे. ‘म्हातारी मेल्याचं दु:ख नसतं, पण काळ सोकावतो’ असं म्हणतात. एकदा तुम्ही काहीजणांना अशी संधी दिली तर उद्या आणखी अनेकजण या संधीची मागणी करतील आणि साहित्य संमेलन हे मनोरंजनाचं केंद्र बनण्यास वेळ लागणार नाही.
अलीकडेच ९५ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं. उदगीरमधल्या या साहित्य संमेलनाला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकूलतेला तोंड द्यावं लागलं. प्रचंड उन्हाळा, तयारीला कमी वेळ मिळणं, प्रचंड खर्च अशा अडचणींशी कसरत करत का असेना, कमी वादांमध्ये हे संमेलन यशस्वी करून दाखवल्याचं श्रेय आयोजकांना द्यावं लागेल. या संमेलनानिमित्त चर्चेत आलेल्या काही मुद्यांचा हा लेखाजोखा.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा समस्त देशवासीयांसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या टप्प्यावर पार पडलेलं ९५ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हादेखील एक महत्त्वाचा महोत्सव होता, असं म्हणावं लागेल. संविधानाला अपेक्षित असणार्या समाजाविषयी चिंतन आणि आत्मपरीक्षण होणं आणि सिंहावलोकन करून त्याबाबतीतले विचार पुढे आणणं हे या संमेलनाकडून अपेक्षित होतं. त्यानुसार या संमेलनात या विषयांवर चर्चा झाली. प्रसारमाध्यमांमध्ये ‘हनुमान चालिसा’च्या वाचनावरून भोंगे वाजत असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी उदगीरमध्ये पार पडलेल्या साहित्य संमेलनाची फारशी दखल घेतल्याचं जाणवलं नसलं तरी प्रिंट मीडियानं नीट दखल घेतल्याचं पाहायला मिळालं हेही नसे थोडके…!
साहित्य हा समाजाचा आरसा असतो. समाजात बर्यावाईट घटनांपैकी महत्त्वाच्या गोष्टींचं प्रतिबिंब साहित्य संमेलनांमध्ये दिसणं अपेक्षित असतं. ९५ वर्षांची दीर्घ परंपरा असल्यामुळे साहित्य संमेलनाच्या मंचाला एक प्रतिष्ठा आहे आणि तिथे होणार्या चर्चेला एक आवाज आणि महत्त्व आहे. या सगळ्या दृष्टीनं पार पडलेल्या अलीकडच्या संमेलनाकडे बघणं गरजेचं आहे. साहित्य हे माहिती, मनोरंजन आणि समाज प्रबोधनाचं एक महत्त्वाचं साधन आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साहित्यिक, वाचक आणि समाजामध्ये संवाद घडवून आणणारं एक माध्यम आहे. या दृष्टीने पार पडलेल्या या संमेलनाकडे पाहिलं तर काही मुद्दे लक्षात येतात. अर्थातच त्यातला पहिला मुद्दा अध्यक्षांच्या भाषणाचा आहे. अनेक उर्दू कथांचा मराठीत अनुवाद करणारे, आपल्या लिखाणाने वेगळी ओळख मिळवणारे प्रसिद्ध लेखक भारत सासणे यांच्या भाषणाचं संमेलनात कौतुक झालं. त्याची नोंद सगळ्यांनीच घेतली. त्यांचं भाषण चुकणार्यांचे कान पकडणारं होतं. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केंद्रीय राजकारणात कार्यरत असणार्यांना, अगदी केंद्र सरकारलाही खडे बोल सुनावले. मध्यंतरीच्या ‘राजा तू चुकतो आहेस’ या गाजलेल्या अध्यक्षीय भाषणाप्रमाणेच धाडस दाखवणरं हे भाषण होतं. सध्या समाजाचे मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून जनतेची दिशाभूल करणारे मुद्दे समोर आणले जातात, भारतीय संविधानाला अपेक्षित नसणार्या गोष्टी राजरोस खपवून घेतल्या जातात, समाजात तेढ पसरवणारे मुद्दे चघळले जातात. या सर्व विषयांवरील अभ्यासपूर्ण विवेचन सासणेसरांनी आपल्या भाषणामध्ये केलं. त्याचबरोबर धर्मवादी राजकारण करणार्यांना आणि संविधानात्मक राष्ट्रवादापेक्षा सांस्कृतिक राष्ट्रवाद आणण्याची योजना राबवणार्यानाही त्यांनी चुकीच्या वर्तनाची जाणीव करून दिली. भारतीय संविधानाला अपेक्षित असणारा समाज निर्माण करण्यामध्ये शासनाची भूमिका सकारात्मक आहे की नकारात्मक, या मुद्यांवर त्यांनी नेमकं बोट ठेवलं.
सासणेसरांचं हे अध्यक्षीय भाषण म्हणजे त्यांच्या निर्भिडपणाचा दाखलाच होता. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर करून घेत मांडणी करणं हे या भाषणाचं वैशिष्ठ्य म्हणावं लागेल. अशा पद्धतीने इतर कोणाला असं ऐकवणं शक्य झालं नसतं. कोणी हे मुद्दे स्पष्टपणे ऐकवण्याचा प्रयत्न केला असता तर तो निश्चितच वादाचा विषय ठरला असता. पण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला एक प्रतिष्ठा असते आणि त्यांचं म्हणणं ऐकून त्यावर विचार केला पाहिजे, त्याविषयी गांभीर्य दाखवलं पाहिजे ही आपली परंपरा आहे. इथे ही परंपरा पाळली गेली याचं समाधान आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्तानं जाणवलेला आणखी एक बदल हा अध्यक्षपदासाठीच्या निवडीमध्येही जाणवत आहे. या पदासाठीची निवड आणि संमेलनानंतर त्या संदर्भात वाद आणि प्रतिवाद चर्चेत राहण्याची परंपरा आपण बराच काळ अनुभवली. पण गेल्या काही वर्षांपासून अध्यक्षाची निवड प्रक्रिया निकोप झाल्याचं जाणवतं. त्यातल्या स्पर्धेच्या, असूयेच्या राजकारणाला आता बगल दिली जात असून, सर्वानुमते संमेलनाचा अध्यक्ष निवडणं ही प्रक्रिया कोणत्याही प्रकारची तेढ निर्माण न करणारी आहे. म्हणूनच ही बाब स्वागतार्ह वाटते.
यापूर्वीचं म्हणजेच नाशिकमध्ये पार पडलेलं साहित्य संमेलन डॉ. जयंत नारळीकर यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि विज्ञानवादी अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं होतं. हे नाव साहित्य संमेलनाची उंची वाढवणारं होतं. परंतु कोरोनामुळे, नारळीकर सरांच्या आजारपणामुळे आणि वृद्धापकाळामुळे त्यांना संमेलनासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नव्हतं. पण हादेखील एक चर्चेचा, वादाचा मुद्दा ठरला होता. त्या संमेलनानंतर अवघ्या तीन-चार महिन्यांत उदगीरचं हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं. म्हणजेच या आयोजकांना तयारीसाठी अत्यंत कमी वेळ मिळाला. तरीदेखील आयोजकांचा उत्साह वाखणण्याजोगा होता. उदयगिरी कॉलेजच्या ३६ एकरच्या परिसरात हे साहित्य संमेलन दिमाखात पार पाडल्याबद्दल आयोजकांचं अभिनंदन केलं पाहिजे. उदगीरमधल्या साहित्य संमेलनाला वेगवेगळ्या प्रकारची प्रतिकूलता होती. प्रचंड उन्हाळा, तयारीला कमी वेळ मिळणं, सर्व स्तरावरील लोकांचा सहभाग अशा सगळ्या अडचणींशी कसरत करीत का असेना, कमी वादांमध्ये हे संमेलन यशस्वी करून दाखवल्याचं श्रेय त्यांना द्यावं लागेल. दुसरी बाब म्हणजे नेहमीप्रमाणे या व्यासपीठावर राजकीय व्यक्तींची उपस्थिती होती. अर्थात राजकारण आणि राजकीय मुद्दे बाजूला ठेवून साहित्याला आणि साहित्यिकांना अग्रक्रम देत त्यांनी मांडलेले विचार नेहमीच स्वागतार्ह ठरतात. या पार्श्वभूमीवर यंदाच्या संमेलनात शरद पवार यांच्यापासून नितीन गडकरी यांच्यापर्यंत राजकारण्यांची उपस्थिती दिसली. पण या दोघांनी परस्परांविषयी कोणतंही राजकीय भाष्य न करता, समंजस पद्धतीनं अनुक्रमे उद्घाटन आणि समारोपाचा कार्यक्रम पार पाडला. त्यांनी वाद आणि प्रतिवादासाठी या व्यासपीठाचा वापर न करणं हीदेखील एक जमेची बाब म्हणायला हवी.
(शब्दांकन : स्वाती पेशवे)