नाझरे धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात

जेजुरी : पूर्व पुरंदर तालुक्याला वरदान ठरलेल्या नाझरे धरणातील उपयुक्त पाणीसाठा शनिवार दि. ३० रोजी संपला असून, हा साठा शून्य टक्के झाला आहे. धरणाच्या मृतसाठ्यात २०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून, त्यातील पाणी ३१ जुलैअखेर पुरंदर व बारामती तालुक्यातील ५६ गावांना उपलब्ध होणार आहे. यंदा पाऊस लांबल्यास पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार आहे.
नाझरे धरणाची क्षमता ७८८ दशलक्ष घनफूट असून, यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने नाझरे धरण पूर्ण क्षमतेने भरू शकले नाही. पुरंदर तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४९६ मिलीमीटर असून, नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील वर्षी ५०८ मिलीमीटरची नोंद झाली. अपुर्या पावसामुळे नाझरे धरण न भरल्याने वारंवार पाणीटंचाईचे संकट निर्माण होत असते. नाझरे धरणावर पुरंदर व बारामती तालुक्यांतील ५६ गावे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असून, सुमारे तीन हजार हेक्टर शेतीला या धरणातून पाणी दिले जाते.
यावर्षी धरण न भरल्याने शेतीसाठी धरणातून आवर्तने दिली नाहीत, तर २८ फेब्रुवारीपासून उपसा योजनाही बंद करण्यात आल्या. २०० दशलक्ष घनफूट पाण्यापैकी केवळ १३० दशलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती नाझरे प्रकल्पाचे उपअभियंता रंगनाथ भुजबळ यांनी दिली.