‘आरे वाचावा’ आंदोलनाला महामोर्चाचे स्वरूप; सर्वच विरोधी पक्षांनी घेतली उडी
मुंबई -AAREY Carshed : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे सरकारने कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या आरेतील कारशेड निर्मितीच्या निर्णयाला पुन्हा एकदा परवानगी दिली. महाविकास आघाडी सरकारने पर्यावरण रक्षणासाठी या कारशेडला स्थगिती दिलेली होती. शिंदे सरकारने त्याला पुन्हा मान्यता दिल्याने पर्यावरण प्रेमी आक्रमक झालेले आहेत.
आरे मधील झाडे तोडण्यास न्यायालयाने बंदी घातलेली असताना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) अवैधरित्या झाडे तोडली जात असल्याच्या विरोधात पर्यावरण प्रेमींकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि एमएमआरसीला पुढील सुनावणीपर्यंत एकही झाड न तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यावेळी एमएमआरसी कडून आम्ही एकही झाड तोडले नसल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यावर पर्यावरणप्रेमी मोठ्या प्रमाणात नाराज झाल्याचे दिसत आहेत.
एमएमआरसीचा खोटेपणा मुंबईकरांच्या समोर आणण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी आरे वाचवा आंदोलन तीव्र केले आहे. आरे मधील पिकनिक पॉईंट येथे मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमी गोळा झाले आहेत. एमएमआरसी विरोधात त्यांच्याकडून निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात येत आहे. सरुवातील या आंदोलनात शिवसेना, काँग्रेस, आप, आणि कम्युनिस्ट पक्षांचे कार्यकर्ते सहभागी होऊ लागले. आता वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील आंदोलनात उडी घेतली आहे. त्यामुळे ‘आरे वाचवा’, ‘झाडे वाचवा’ आंदोलनाला महामोर्चाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.