‘धर्मवीर’मध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणारा अभिनेता संतापला; म्हणाला,”मोठी राजकीय…”

मुंबई | सध्या राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकासआघाडी सरकार अडचणीत आलं आहे. महाविकासआघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३० पेक्षा जास्त आमदार असून ते सध्या आसाम राज्यातील गुवाहाटी येथे आहेत. एकीकडे राजकीय तर्कविर्तक लावले जात असताना दुसरीकडे अनेकजण यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. यामध्ये आता ‘धर्मवीर’ चित्रपटात एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणारा अभिनेता क्षितीश दाते याने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे संताप व्यक्त केला आहे.
अभिनेता क्षितीश दातेने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. क्षितीशने एका वृत्तपत्राच्या कात्रणाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये क्षितीशचा ‘धर्मवीर’मधील लूक पाहायला मिळत आहे. तसंच ‘थोडे दिवस मलाच एकनाथ समजून बैठकीत घ्या’ असं या फोटोबरोबर लिहिलेलं दिसत आहे.
क्षितीशनं हा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, “मोठी राजकीय उलाढाल चालू आहे. चेष्टेमध्ये मीम्स येणं वेगळं आणि वर्तमानपत्रात छापणं हे वेगळं. हे असं छापणं चूक आहे.” एका वर्तमानपत्रामध्ये मीम्स छापून आल्याने क्षितीशने सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त केला आहे. ‘धर्मवीर’ चित्रपटात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिशने उत्तमरित्या साकारली आहे.
