सेंट ज्यूड शाळेजवळ वाहतूक पोलिस नेमा

देहूरोड : देहूरोड पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर व जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या सेंट ज्यूड शाळेच्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागत आहे. महामार्गावर भरधाव वाहने धावत असतात. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळात महामार्गावर वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी, तसेच येथे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी युवा सेनेचे उपतालुका अधिकारी विशाल दांगट आणि शिवसेना शाखा प्रमुख लालचंद शर्मा यांनी केली आहे.
याबाबत दांगट आणि शर्मा यांनी देहूरोड वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. जुन्या पुणे महामार्गावर सेंट ज्यूड शाळेजवळ शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेस विद्यार्थी, विद्यार्थी वाहतुकीची वाहने, दुचाकी यांची मोठी वर्दळ असते. त्याचवेळी महामार्गावरून भरधाव वाहने धावत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागतो. अशावेळी अपघात घडण्याची दाट शक्यता असते. जवळ पोलिस ठाणे असतानाही येथे वाहतूक पोलिस का कार्यरत नसतो, हा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.