महाराष्ट्ररणधुमाळी

राज्यस्तरीय खरीप हंगामाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

कृषिमंत्र्यांचे शेतकर्‍यांना आवाहन
खरीप हंगाम २०२२ मध्ये प्रमुख अन्नधान्य पिकांचे १५१.३३ लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली अपेक्षित आहे. खरीप हंगामात खोडमाशीच्या प्रादुर्भावाची शक्यता गृहीत धरून तिचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पुरेसा पाऊस होणार आहे; परंतु पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकरी बांधवांनी पेरणी करू नये.

मुंबई : राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. राज्य शासनाने विकासाची पंचसूत्री स्वीकारली असून, कृषी क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे आवाहन करीत यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. तसेच शेतकरी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणार्‍या भाज्या, कडधान्यांचे दहा वाण मोफत देणारे, शेतकरी बांधवांच्या आरोग्याचा विचार करणारे महाराष्ट्र देशातले पहिले राज्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक २०२२’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार उपस्थित होते. तर दूरदृष्यप्रणालीद्वारे पालकमंत्री, विभागीय आयुक्त, कृषी विद्यापाठांचे कुलगुरू, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ज्या राज्यात शेतकरी सुखी ते राज्य सुखी. शेतकरी बांधव कष्ट करीत असताना स्वत:च्या, कुटुंबाच्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणार्‍या भाज्या, कडधान्यांचे दहा वाण राज्य शासन आता शेतकरी बांधवांना मोफत देणार आहे. शेतकरी बांधव आपल्या कुटुंबातले घटक आहेत.

त्यामुळे यंत्रणेने आपुलकीने कुटुंबासारखे काम करावे. ‘विकेल ते पिकेल’ अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले पाहिजे. रोग, किडींचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी सतर्कता बाळगली पाहिजे. शेतमालाला हमी भाव आहे, पण हमखास भाव मिळाला पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. शेतकरी बांधवांसमोर पीक विम्याचा प्रश्न आहे. पीक विमा समाधानकारक नाही. केंद्राकडे याबाबत पाठपुरावा सुरू आहे. याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. कृषी विभागाचे खरीप हंगामाचे नियोजन समाधानकारक आहे. त्यामुळे आपणा सर्वांच्या प्रयत्नाने, सहकार्याने यंदाचा खरीप हंगाम यशस्वी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये