ताज्या बातम्यापुणे

रेल्वेगाड्यांचे बंद थांबे लवकरच पूर्ववत सुरू होणार

रेल्वेमध्ये सध्या स्वच्छतेचे काम चांगल्या प्रकारे होत असल्याबद्दल खा. सुप्रिया सुळे यांनी रेल्वे मंत्रालयाचे अभिनंदन केले. असे असले तरी बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड , नीरा, जेजुरी स्थानकांवर रेल्वेगाड्यांचे थांबे कमी करण्यात आल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. संसदेत झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान त्यांनी रेल्वे मंत्रालयाविषयी प्रश्न उपस्थित केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लवकरच सर्व थांबे पूर्ववत सुरु करण्यात येतील, अशी ग्वाही दिली.

बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड रेल्वेस्थानकावर याअगोदर ८० रेल्वेगाड्या थांबत होत्या, त्यांची संख्या एकदम निम्याने कमी करण्यात आल्या असून, सध्या याठिकाणी केवळ ४० रेल्वेगाड्या थांबत आहेत. दौंड स्थानकाबरोबरच जेजुरी, नीरा आणि अन्य स्थानकांवरील रेल्वेगाड्यांचे थांबे कमी न करता वाढवण्याची गरज आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सांगितले.

रेल्वेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काही थांबे कमी केल्याचे रेल्वे मंत्रालय सांगत आहे. मात्र या निर्णयामुळे त्यामुळे दौंड, बारामती, नीरा तसेच जेजुरी या भागातील भागातील अर्थकारण अडचणीत आले आहे. दौंड हे एक मोठे जंक्शन आहे. रेल्वेच्या माध्यमातून उत्तर भारताला दक्षिण भारताशी जोडणारे हे एक मोठे स्थानक असून, या भागातील खूप मोठे अर्थकारण रेल्वेवर अवलंबून आहे. याठिकाणी पूर्वी ८० रेल्वे गाड्यांना थांबा होता, तो एकदम ४० वर आणण्यात आला आहे. परिणामी या भागातील अर्थकारणावर विपरीत परिणाम होत आहे. हे लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने कार्यक्षमता वाढवण्यासाठी थांबे कमी करण्यापेक्षा इतर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सुळे यांनी यावेळी केली. त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच हा प्रश्न सोडवण्यात येईल, अशी ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये