“त्यावेळी आत्महत्या करण्याचा विचार यायचा…”,दीपिका पदुकोणचं वक्तव्य चर्चेत!

मुंबई | Deepika Padukone’s Statement In Discussion – अभिनेत्री दीपिका पदुकोण ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने बाॅलिवूडसोबतच हाॅलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. तसंच तिचा आजपर्यंतचा अभिनय क्षेत्रातला प्रवास, तिच्या आयुष्यात आलेला नैराश्याचा काळ, नातेसंबंध, वैयक्तिक आयुष्य यावर दीपिका नेहमीच खुलेपणाने बोलत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने तिच्या आयुष्यातील नैराश्य काळाबद्दल सांगितलं आहे. “त्यावेळी जर माझी आई नसती तर मी बरी होऊ शकली नसती”, असा खुलासा तिने यावेळी केला आहे.
यावेळी दीपिका म्हणाली, “त्यावेळी नैराश्य येण्यामागचं तसं काही कारण नव्हतं. तो माझ्या करिअरमधील उत्तम काळ होता. सगळं व्यवस्थित सुरू होतं. पण तरीही मी कधी कधी पूर्णपणे खचून जायचे. अशावेळी आत्महत्या करण्याचा विचार देखील यायचा.”
“एकदा माझे आई वडील घरी आले असताना त्यांनी मला पूर्ण खचलेले पाहिलं. त्यावरून माझ्या आईला हे नैराश्य असल्याचं लक्षात आलं आणि आईमुळे मला यातून बाहेर पडण्यास मदत झाली” असं देखील दीपिका म्हणाली.
दरम्यान, दीपिका लवकरच अभिनेता शाहरूख खानसोबत ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार आहे. आगामी जानेवारी महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.