देश - विदेश

तब्बल ४०% विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारातच!

आशिष रामटेके |
पुणे : सीबीएसई बोर्डच्या शैक्षणिक नियमानुसार दोनसेमिस्टरची परीक्षा घेणे संबंधित शाळांना बंधनकारक असते. मात्र, पी. जोग शाळेने पहिल्या सेमिस्टरची परीक्षा न घेता दुसऱ्या सेमिस्टरमध्ये कमी मार्क देऊन तब्बल ४० टक्के विद्यार्थ्यांना रीतसर नापास केले आहेत. तर याबरोबरच ९० टक्के टॉपर असलेल्या विद्यार्थाना केवळ ४५- ६० टक्के मार्क देऊन अशा विद्यार्थ्यांची सुद्धा चक्क फसवणूक केली आहे. आता नापास करण्यात आलेल्या ४० टक्के विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात असून त्याबरोबरच ९० टक्के मार्क घेऊन टॉपर असणाऱ्या शाळेतील एकूण ६० टक्के विद्यार्थ्यांना कमी टक्केवारी मार्क मिळाल्याने त्यांची डिप्लोमा, इंजिनिअरसारख्या आवडत्या विषयात ॲडमिशन होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नापास विद्यार्थ्यांसह कमी गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या टॉपर असलेल्या ६० टक्के विद्यार्थ्यांचेसुद्धा शैक्षणिक भवितव्य अंधारातच जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोथरूड येथील पी. जोग शाळेत सीबीएसईचा निकाल मागील जुलै महिन्यात जाहीर झाला होता. जाहीर झालेल्या निकालात एकूण ९९ टक्के विद्यार्थ्यांपैकी तब्बल ४० टक्के विद्यार्थ्यांना पी. जोग शाळेने रीतसर नापास केले आहे. सीबीएसईच्या नियमाप्रमाणे दोन सेमिस्टरमध्ये परीक्षा घेणे बंधनकारक असतानाही जोग शाळेने मुळातच पहिली सेमिस्टरची परीक्षा घेतली नाहीत. त्या वेळेस शाळेने संबंधित ४० टक्के नापास विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन दुसऱ्या सेमिस्टरमध्ये मार्क दिले जातील, असे आश्वासन दिले होते. परंतु दुसऱ्या सेमिस्टरमध्ये सुद्धा नापास विद्यार्थ्यांना पूर्वीचे मार्क दिले गेले नाहीत. त्यामुळे ४० टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. निकाल जाहीर होताच तुमचे विद्यार्थी नापास झाले आहेत, असे शाळेकडून नापास विद्यार्थ्यांच्या सर्व पालकांना सांगण्यात आले. उर्वरित ६० टक्के विद्यार्थ्यांना केवळ थातुरमाथुर म्हणजे काहींना ४५ ते ५० टक्के, तर काही विद्यार्थ्यांना ६० टक्के पेक्षा कमी मार्क देऊन उत्तीर्ण केल्याचे दिसून आले आहे.

विद्यार्थ्यांना नापास कस केलं, यातलं मला काहीच माहीत नाही. मी गेल्या तीन महिन्यांपूर्वीच या शाळेत जॉइन झाले आहे. सध्या मी सुद्धा या ठिकाणी नवीनच आहे. या संदर्भात काही माहिती हवी असेल तर जोग कॉलेजच्या प्रमुखांसोबत संपर्क साधू शकता. कृपा करून या संदर्भा विषयी प्रश्न विचारू नका. विद्यार्थ्यांच्या पालकांनी केलेलं आंदोलन मला माहीत नाही. मात्र, यातील नवीन काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीन.
_पल्लवी शिंदे, मुख्याध्यापिका, पी. जोग स्कूल ( कोथरूड )

खरं तर आम्हाला पहिल्या सेमिस्टरचे हॉल तिकीटच आले नव्हते. आमची परीक्षा सुद्धा झाली नाही. आम्हाला मार्क दिले जातील असे सांगण्यात आले होते. पण तसे प्रत्यक्षात झाले नाही. पहिल्या सेमिस्टरचे गुण न मिळाल्याने आम्हाला चक्क नापास करण्यात आले आहे. त्यामुळे आमचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. शाळेने आम्हाला विश्वासात घेतले नाही. मला गणित आणि सायन्स विषयात नापास दाखविण्यात आलं आहे. मी नापास होणं शक्य नाही. मी नववीतील टॉपर विद्यार्थिनी आहे.
– एक नापास विद्यार्थिनी, पी. जोग स्कूल ( कोथरूड )

मुळातच वस्तुस्थिती अशी, की या ६० टक्के विद्यार्थ्यांपैकी २० टक्के विद्यार्थ्यांना एटीकेटीच्या आधारे काठावर पास केल्याचे दैनिक ‘राष्ट्रसंचार’च्या प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले आहे. तर उर्वरित ४० टक्के विद्यार्थी जे नववीत टॉपर होते म्हणजे किमान ९० टक्के मार्क घेऊन पास झाले आहेत, अशा किमान ४० टक्के विद्यार्थाना फक्त ४५ ते ५० आणि ६० टक्के गुण देऊन उत्तीर्ण केले आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक भवितव्य अंधारातच जाणार आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
सीबीएसईच्या निकालाबाबत मात्र ४० टक्के नापास विद्यार्थ्यांच्या संतप्त पालकांनी जुलै महिन्यातच रीतसर नाराजी व्यक्त करत शाळेच्या विरोधात शाळेच्या आवारातच गोंधळ घालत मोठं आंदोलन केलं होते. मात्र, या संदर्भात जोग शाळा प्रशासनाला अद्यापही जाग आलेली नसल्याचे आता एकंदरीत दिसून आले आहे.

सीबीएसईच्या पहिल्या सेमिस्टरचे पेपर न घेताच शाळेने निकाल जाहीर केल्याचा आरोप या पालकांनी सुद्धा या वेळी केला होता. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना खोटे मार्क देत रिझल्ट लावून ९० टक्के मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा केवळ ६० टक्के निकाल लावल्याचा थेट आरोपसुद्धा पालकांनी केला आहे. सीबीएसईच्या नियमानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर हे दोन टर्ममध्ये होऊन दोन्ही टर्मचे मार्क हे बोर्डाला कळवावे लागतात. पण या शाळेने पहिल्या टर्मचा पेपरच घेतला नाही. त्यामुळे ४० टक्के विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे सीबीएसई बोर्ड हा इयत्ता पाचवी पासून द्यायचा असतो. पण या शाळेने या विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्ड हा नववीला दिला. त्यामुळेच प्रशासनाने भोंगळा कारभार केला असल्याचा आरोप पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

पी. जोग शाळेच्या एका चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. नववीत टॉपर असलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या सेमिस्टरमध्ये कमी टक्के गुण देण्यात आले आहेत. यामध्ये अशा जवळपास ६० टक्के विद्यार्थाना साधारणतः ४५, ५०, ५५ आणि ५८ च्या गुणांची टक्केवारीचा समावेश आहे. हे एकूण ६० टक्के विद्यार्थी ९० टक्के घेऊन कायम टॉपर राहायचे. मात्र, अशा विद्यार्थ्यांना कमी टक्केवारी देऊन शाळेने अशा हुशार विद्यार्थ्यांवर एकप्रकारे अन्यायच केला आहे. यातील काही विद्यार्थ्यांना इंजिनिअरला ऍडमिशन घ्यायची होती. मात्र, यावेळी इंजिनिअरला ८० टक्केला क्लोज झाल्याने यातील बहुतांश विद्यार्थ्यांना रीतसर ॲडमिशन मिळू शकले नाहीत.

मॅनेजमेंट कोट्यातून त्यांना अॅडमिशन घ्यावे लागत असल्याची धक्कादायक माहितीसुद्धा दैनिक ‘राष्ट्रसंचार’ने समोर आणली आहे. इंजिनिअरिंगला ॲडमिशनसाठी मॅनेजमेंट कोट्यात दोन किंवा अडीच लाख रुपये भरून ॲडमिशन करावी लागत आहे. यामध्ये बहुतांश गरीब हुशार विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत आहे. याला सर्वस्वी जोग शाळा जबाबदार असून शाळेवर शिक्षण विभागाने कठोर कारवाई करावी अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे. यामध्ये बहुतांश पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे आढळून आले आहे. आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी यातील बऱ्याच पालकांनी घरातील दागिने विकून अथवा गहाण ठेवून, पतपेढीतून कर्ज काढून शिक्षणासाठी पैसा वापरला आहे. मात्र, याचे शाळेला काही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. शाळेच्या चुकीच्या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

सीबीएसईची मान्यता नसतानाही विद्यार्थी अंधारातच

पी. जोग शाळेने दहावीचा सीबीएसई निकाल फक्त एकाच सेमिस्टरवरून लावला आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे पालकांनी सांगितले. शाळेने केवळ सेमिस्टरवर दहावीचा निकाल लावला आहे. यामध्ये साधारणतः ४० टक्के विद्यार्थीना शाळेने नापास केले आहे. या चुकीच्या निकालामुळे आमची मुले घाबरलेली आहेत. त्यांना काय झालं तर याची जबाबदारी कोण घेणार, अशा संतप्त पालकांच्या प्रतिक्रिया आहेत. पालक म्हणाले. ‘‘शाळेने पालकांना विश्वासात घेतले गेले नाहीत. शाळेच्या प्राचार्यांनीही आम्हाला खोटी माहिती दिली. पहिल्या सेमिस्टरची परीक्षा शाळेने घेतली नव्हती. पहिल्या सेमिस्टरपर्यंत शाळेला सीबीएसईची मान्यता नव्हती. ही महत्वाची बाबसुद्धा शाळेने विद्यार्थी आणि पालकांपासून जाणूनबुजून लपवून ठेवली होती. यापासून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना आजपर्यंत अंधारातच ठेवण्यात आलं होत. शाळेला सीबीएसईची मान्यता नसल्याने त्याबद्दल शाळेने ५ लाखांचा दंडसुद्धा भरला आहे. शाळेने परीक्षा न घेता हा निकाल लावल्याने आमच्या मुलांचे मोठे नुकसान झाल्याचे पालकांनी सांगितले.

यापूर्वीही जोग एज्युकेशन ट्रस्टवर कारवाई

जोग एज्युकेशन ट्रस्टने ११ शाळांचे बनावट प्रमाणपत्र तयार करून शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांच्या कोट्यवधी रुपयांचा शुल्काचा परतावा शिक्षण विभागाकडून लाटण्याचा प्रकार केला आहे. या प्रकरणी जोग एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षांसह तत्कालीन उपशिक्षणाधिकारी आणि चौघांवर बंडगार्डन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोग एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा सुरेखा सुहास जोग, तत्कालीन उपशिक्षणाधिकारी किशोर पवार, वरिष्ठ सहायक गौतम शंकर शेवडे, हेमंत सावळकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी विस्तार अधिकारी किसन दत्तोबा भुजबळ यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार जानेवारी २०१९ ते मे २०२२ या कालावधीत घडला आहे. बनावट स्वमान्यता प्रमाणपत्र तयार करून संस्थेवर प्रशासक नियुक्ती टाळण्यासाठी; तसेच ‘आरटीई’अंतर्गत मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांच्या शुल्क परताव्याचा लाभ मिळविण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रस्तावासोबत खोटी स्वमान्यता प्रमाणपत्रे जोडली आहेत. तत्कालीन उपशिक्षणाधिकारी किशोर पवार यांना प्रत्येक मान्यता प्रमाणपत्रासाठी २५ हजार याप्रमाणे ११ शाळांसाठी दोन लाख ७५ हजार रुपये जानेवारी २०२० मध्येच दिल्याचे म्हटले आहे.

शाळा प्रशासनाकडून टोलवाटोलवी सुरूच…

नापास विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या समाधानासाठी आणि कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी जोग शाळा प्रशासनाने किमान दोन किंवा तीन विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन:परीक्षा देऊ शकतील असे सांगण्यात आले आहे. त्यासाठी सीबीएसई बोर्डाकडे ७० हजार रुपये फी भरून फाॅर्म भरल्याचे सांगितले आहे. एका विषयासाठी ५०० रुपये याप्रमाणे ही रक्कम आहे. मात्र, यावर नापास विद्यार्थ्यांच्या पालकांना विश्वास नाही. जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या हातात परीक्षेचे हॉल तिकीट मिळत नाही तोपर्यंत सांगणे कठीणच आहे. यापूर्वी जोग शाळा प्रशासनाने याच महिन्यातील ५ आणि ८ तारीख दिली होती. पण हॉल तिकीट दिले नाहीत. त्यामुळे सध्या तरी शाळा प्रशासनाकडून टोलवाटोलवी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

एटीकेटी व टॉपर विद्यार्थ्यांचेही भवितव्य अंधारातच

खरं तर पी. जोग शाळेला सीबीएसई बोर्डाची मान्यता नव्हती. तरीही शाळा प्रशासनाने विद्यार्थी व पालकांची दिशाभूल केली आहे. आता शाळा प्रशासनाकडून या वर्षी शाळेला सीबीएसई बोर्डची मान्यता मिळाली असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र हे कितपत सत्य आहे, हे येणार काळच ठरवेल. शाळेने एकूण ९९ पैकी ४० टक्के विद्यार्थ्यांना नापास केले आहेत. यामध्ये २० टक्के विद्यार्थ्यांना काठावर म्हणजे एटीकेटी देऊन पास करण्यात आले आहे तर उर्वरित ४० टक्के विद्यार्थ्यांना ४५, ५० आणि ५८, ६० टक्केच्या गुणांनुसार उत्तीर्ण केले आहेत. असे असले तरी या टक्क्याच्या आधारे चांगल्या कॉलेजमध्ये चांगल्या विषयात मनासारखं ॲडमिशन मिळत नसल्याने अशा एटीकेटी व मुळातच टॉपर असलेल्या परंतु आता कमी मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक भवितव्य अंधारातच जमा होत असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये