अनुवंशिकता की वातावरण

शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या म्हणीप्रमाणे मुलांची उंची, रंग, वजन, ठेवण, देखणेपणा, केसांची रचना इतकेच नव्हे, तर मेंदूचा आकार, मुलांचे आरोग्य हे सर्व अनुवंशाने येत असते. जेव्हा आईच्या पोटात गर्भधारणा होते तेव्हा मागील सात पिढ्यांतील अनुवंशिक गुणधर्म येत असतात. परंतु अनुवंशिक गुणधर्म फुलवायचे की तसेच दाबून ठेवायचे, हे मात्र सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असते.
योग्य आहार, व्यायाम आणि निरोगी वातावरण यामुळे बाळाची शारीरिक वाढ उत्तम होते. जरी अनुवंशाने काही गुणधर्म आले नसले तरी योग्य वातावरणाने ते निकासित करता येतात. उदा- नेपाळ, जपान, कोरिया येथील व्यक्तींची उंची अनुवंशाने कमी होती, परंतु या राष्ट्रांनी योग्य व्यायाम करून उंची वाढवलेली आहे. म्हणजेच आपल्याला आपल्या बाळाला सकस वातावरण भेटत आहे का, याचा विचार करावा लागेल?
मेंदूची रचना, मेंदूचा आकार, मेंदूतील पेशींची संख्या ही जरी अनुवंशाने येत असली तरी, ती सर्व मुलांमध्ये सारखीच असते. बाळ बौद्धिक गुणधर्म अनुवंशाने घेऊन येत नाही, तर ती सभोवतालच्या वातावरणातून निर्माण होत असतात. आईच्या गर्भाशयातून बाहेर आल्यानंतर पहिली रडण्याची किंचाळी आणि बाळाची नाळ कापली की, सर्व क्रिया स्वतःला कराव्या लागतात, तेव्हाच मेंदूमधील न्यूरॉन्स पेशी ॲक्टिव्ह होतात.
येथूनच मेंदूचा विकास म्हणजेच बौद्धिक विकास सुरू असतो. म्हणजेच ९९.९९% बौद्धिक विकास हा पूर्णपणे सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असतो. मग नैसर्गिकपणे आपल्या मुलांचा बौद्धिक विकास अधिक गतीने झाला पाहिजे, यासाठी आपण खरेच सकस वातावरण देतो का? अडाणी कुटुंबातील, आदिवासी भागातील मुलेसुद्धा खूप मोठे यश मिळविणारी आपण पाहतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, नारायण कृष्णमूर्ती, इतकेच नव्हे, तर प्रत्येक वर्षी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणारे विद्यार्थीसुद्धा ग्रामीण, अशिक्षित पिढीतील असल्याचे आढळून येते.
मग या मुलांच्या सभोवताली कोणते वातावरण असते. मेंदूमध्ये न्यूरॉन्सच्या जोडण्या किती होतात? यावर मेंदूचा विकास म्हणजेच बौद्धिक विकास अवलंबून असतो. पहिल्या पाच वर्षांत मेंदूविकासाचा, बौद्धिक विकासाचा पाया भरला जात असतो. वृद्धावस्थेपर्यंत आपला बौद्धिक विकास होत असतो. परंतु बौद्धिक विकास हा पूर्णपणे आपल्या सभोवतालचे वातावरण, त्या वातावरणाला आपला प्रतिसाद आणि त्यातून निर्माण होणारी आपली मानसिकता यावर अवलंबून असतो.