आरोग्यन्युट्रीशियनफुड फंडाबॅक टू नेचर

डाळिंबाचे आरोग्यदायी फायदे

आहारतज्ज्ञ जान्हवी अक्कलकोटकर |

सध्याचे चालू सीझनल फळ म्हणजेच डाळिंब. डाळिंब हे औषधी अन्न म्हणून फार महत्त्वाचे आहे. आयुर्वेदाच्या प्राचीन वैद्यांनी हलके अन्न व हृदयाला पोषक आहार म्हणून त्याचा वापर सांगितला आहे. तापात सतत लागणाऱ्या तहानेवर डाळिंबाचा रस थंड व‌ हितकर आहे. यकृत, हृदय व मूत्रपिंड यांचे कार्य सुधारण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. शरीरास आवश्यक खनिजे पुरवून ते अन्नातील अ जीवनसत्त्व शोषण साठवण्यास यकृताला मदत करते. रोगजंतूंचा प्रादुर्भाव कमी करून प्रतिकारशक्ती वाढवते. पचन संस्थेच्या तक्रारी, कोलायटिस व म्युकस यांनी पीडित अशा रुग्णांना अतिशय उपयुक्त असते.

आतड्यांना बळ देते व मल बांधते. पित्ताच्या उलट्या होत असल्यास एक चमचा डाळिंबाचा रस व एक चमचा मध मिसळून देतात. पित्तामुळे छातीत होणारी जळजळ व गर्भवतीच्या सकाळच्या उलट्यांवरही हे एक औषध आहे. अतिसार व अामांश : डाळिंबातील आम्लामुळे पेशी आक्रसतात, म्हणून अतिसार व आमांश यावर उपयोगी आहे. सतत होणाऱ्या जुलाबांनी रुग्णाला अशक्तपणा येत असल्यास एकावेळी डाळिंबाचा पन्नास मिली रस द्यावा. त्याने जुलाब थांबतात, शिवाय त्यातून रक्त पडत असेल तर तेही थांबते.

आतड्यातील कृमी आयुर्वेदानुसार डाळिंबाच्या सालांचा व फळांचे देठ यापासून बनवलेला काढा आतड्यातील जंतूंवर परिणामकारक असतो. त्यामुळे सर्व प्रकारचे जंत पडून जातात. ताप : तापातील तहान व उष्णता कमी करण्यास डाळिंबाच्या रसात किंचित केशर घालून द्यावे. टायफॉस गॅस्ट्रिक व दम्यामुळे येणारे तापावर पिकलेल्या डाळिंबाचे सरबत प्यावे. सालीचा काढा ताप येऊ नये, म्हणूनही देतात.

मूतखडा : मूतखड्यासाठी डाळिंबाच्या बिया परिणामकारक ठरतात.
दातांच्या व हिरड्यांच्या तक्रारी : डाळिंब हे चोथायुक्त फळ असल्यामुळे चावून चावून खाल्ले की डाळिंब हिरड्यांच्या मजबुतीसाठी खूप फायदेशीर ठरते. तसेच त्यामुळे हिरड्या बळकट होऊन त्यातून रक्त येणे थांबते. शिवाय दात स्वच्छ होतात. दात टिकाऊ, बळकट होतात. डाळिंबामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे रक्तवर्धक म्हणून काम करते. ज्यांच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल त्यांनी नेहमी डाळिंबाचे सेवन करावे. डाळिंब रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते, कारण यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. तसेच वजन कमी करण्यासाठीसुद्धा हे डाळिंब भरपूर फायदेशीर ठरते.

इतर उपयोग : डाळिंब हे भोजनोत्तर पाचक फळ म्हणून खाल्ले जाते. त्याचा रस काढणे कौशल्याचे काम आहे. त्यात पाणी व साखर घालून चवीष्ट सरबत होते. सिरप, आईस्क्रीम, जेली व मारमालेड करताना डाळिंबाचा वापर केला जातो. डाळिंब हे टिकाऊ फळ आहे. थंड हवेत बर्फात तर ते सहा महिने चांगले टिकते. जाड सालीमुळे फळातील नाजूक व रसाळ बिया सुरक्षित राहतात. फळ कापल्याबरोबर लगेच खाऊन संपवावे, नाहीतर बियांचा रंग उतरू लागतो. डाळिंब खाताना कधीही धूम्रपान करू नये. त्यामुळे आतड्यांवर वाईट परिणाम होऊन अपेंडिसायटिस होण्याचा धोका वाढतो.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये