पुणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट; अंदमानातील बेटाला पुणेकर वीरयोद्ध्याचे नाव

देशातील 21 परम वीर चक्र विजेत्यांची नावे अंदमानातील बेटांना देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी नुकताच घेतला आहे. त्याच नामावलीत पुणेकर वीरयोद्धा परम वीर चक्र विजेते राम राघोबा राणे (Ram Raghoba Rane) यांच्या नावाचा समावेश आहे. पुणेकर (Punekar) असलेले राणे यांचे नाव अंदमानातील एका बेटाला देण्यात आले आहे.
1948 च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या स्मरणार्थ त्यांना परम वीर चक्र (Param vir Chakra) प्रदान करण्यात आले होते. राम राघोबा राणे (Ram Raghoba Rane) हे वयाच्या 22 व्या वर्षी त्या काळी असलेल्या ब्रिटिश इंडियन आर्मीच्या बॉम्बे इंजिनीयर रेजिमेंटमध्ये दाखल झाले होते. दुसऱ्या महायुद्धातही त्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी गाजवलेल्या कामगिरीबद्दल त्यांना हवालदार (सर्जंट) पदी बढती मिळाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राणे यांची नियुक्ती बॉम्बे सॅपर्समध्ये करण्यात आली. त्यांना सेकंड लेफ्टनंट हे पद देण्यात आले होते. 1948 च्या भारत पाकिस्तान युद्धात राजौरी, नौशेरा परिसरात त्यांनी गाजवलेल्या अतुलनीय शौर्याचा गौरव म्हणून त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले होते. 1958 मध्ये ते मेजर म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर 1958 ते 1971 पर्यंत राणे पुनर्नियुक्तीवरील अधिकारी म्हणून सैन्यात कार्यरत राहिले. ११ एप्रिल १९९४ रोजी पुण्यातील सदर्न कमांड रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
31 जानेवारी 2020 रोजी बॉम्बे सॅपर्सच्या स्थापनेला 200 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात राणे यांच्या पत्नी राजेश्वरी राणे यांनी आपल्या पतीला मिळालेले परम वीर चक्र तत्कालीन लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना सुपूर्द केले. हे पदक घरात राहण्यापेक्षा लष्कराकडेच राहिले तर अधिकारी आणि जवानांना त्यातून प्रेरणा मिळत राहील, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.