हिमाचलच्या विधानसभेवर खलिस्तानी झेंडा फडकवला
गुरुपतवंत सिंग पन्नू जे शीख फॉर जस्टीसचे प्रमुख आहेत त्यांनी हिमाचलच्या मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना पत्र पाठवून भिंद्रनवाला आणि खलिस्तानचा ध्वज शिमल्यात फडकावला जाईल, अशी धमकी दिली होती. त्यानंतर हिमाचल प्रदेश सरकारने भिंद्रनवाला आणि खलिस्तानचा ध्वज असणार्या वाहनांवर राज्यात बंदी घातली होती. या संघटनेने २९ मार्च रोजी खलिस्तानी झेंडा फडकावण्याचे जाहीर केले होते, मात्र कडक सुरक्षेमुळे तसे करता आले नव्हते.
धर्मशाळा : हिमाचल प्रदेश विधानसभेच्या मुख्य प्रवेशद्वारावर खलिस्तानी झेंडे लावण्यात आल्याची घटना घडली आहे. विधानसभेच्या बाहेर हे झेंडे लावलेले आढळून आले असून त्याच्यावर खलिस्तान असे नाव लिहिलेले आहे. रविवारी सकाळी हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला येथील विधानसभा भवनाच्या मुख्य गेटवर खलिस्तानी झेंडे लावल्याची घटना घडली आहे. विधानसभा भवनाच्या भिंतींवर बाहेरील बाजूस खलिस्तानीसमर्थक घोषणादेखील लिहिण्यात आल्या आहेत. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
धर्मशाला येथील विधानसभा भवनाच्या गेटवर खलिस्तानी झेंडे लावल्याची माहिती कांगडा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर विधानसभा भवन परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.या घटनेबाबत अधिक माहिती देताना उपायुक्त डॉ. निपुण जिंदाल म्हणाले की, काही समाजविघातक घटकांनी तापीवन येथील विधानसभा भवनाच्या मुख्य गेटवर पाच ते सहा खलिस्तानी झेंडे लावले होते आणि भिंतीवर ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषण्या लिहिल्या होत्या. संबंधित झेंडे काढून टाकण्यात आले आहेत. तसेच बाहेरील भिंतीवर लिहिलेल्या घोषणा पुसण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे.
धर्मशाला येथील विधानसभा भवनाच्या गेटवर खलिस्तानचे झेंडे लावण्याच्या भ्याड कृत्याचा मी निषेध करतो. या विधानसभेत फक्त हिवाळी अधिवेशन आयोजिले जाते. त्यामुळे या ठिकाणी फारशी सुरक्षाव्यवस्था तैनात नसते. याचाच फायदा काही समाजविघातक घटकांनी घेतला आहे. असे कृत्य आम्ही सहन करणार नाही. असे कृत्य करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या कृत्याचा निषेध करीत हिंमत असेल तर त्यांनी उजेडात समोर येऊन दाखवावे, असे अंधारात नाही, असा इशारा मुख्यमंत्री ठाकूर यांनी दिला आहे.