अग्रलेखराष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

‘एक उनाड दिवस जगावा’च माणसाने…

अश्विनी धायगुडे – कोळेकर

आपण सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसं… आपल्या विवंचनाही सामान्यच म्हणाव्या अशा… आपण रोज उठतो, कामाला जातो, मान मोडेपर्यंत काम करतो… घरी येतो, जेवण करतो, झोपतो आणि दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा तेच रहाटगाडगं सुरू…  आपण नेमके जगतो कोणासाठी…?

या सगळ्यात आपण व आपले जवळचे कुठे असतात? आयुष्यातले काही क्षण तर कधी जगतो का स्वतःसाठी, त्यांच्यासाठी ?
शोध घेतलाय कधी स्वतःच्या आवडी निवडीचा…? आठवतंय का शेवटचं कधी ऐकलं होतं तुमचं आवडतं गाणं? किंवा कधी पाहिला होता तुमचा आवडता सिनेमा? कधी गेला होतात एकटेच लाँग ड्राईव्हला? कधी दिलीय स्वतःला स्वतःचीच सोबत?
खाल्लीय का कधी एकट्यानेच पाणीपुरी, तीही रस्त्यावरची…? हायजिनचा कसलाही विचार न करता? कधी घेतलं होतं हातात तुमच्या लाडक्या लेखकाचं – तुमचं आवडतं पुस्तक ?? आवडती कविता कधी गुणगुणली होती शेवटची…?

कधी भिजलाय पावसात… मनसोक्त… आवडत्या व्यक्तीच्या साथीने? जगाची पर्वा न करता… अगदी वयाच्या पन्नाशी-साठीमध्येही हव्या त्या रंगाचे आणि हवे तसे कपडे कधी घातलेत का ? कधी मारली होती घट्ट मिठी तुमच्या जिवलगांना…? शेवटचं कधी सांगितलं होतं त्यांना की ते आहेत फार महत्त्वाचे तुमच्या आयुष्यात…? तुमचं फार प्रेम आहे त्यांच्यावर ते…
फार कमी प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असतील ना !

कारण आपण सुखाच्या मागे धावतोय… पण नेमकं सुख आहे कशात तेच कळत नाही…
आपण स्वतःला तर या काळात विसरलो आहोतच, पण आपल्या जिवाभावाच्या माणसांनाही अंतर दिलं आहे. आपण त्यांच्यासाठी जगतो असा आव आणतो, पण मुळात आपल्या जगण्याची दिशाच पुरती बदलली आहे.
खरंतर आपण आपल्या जवळच्या, जिवाभावाच्या माणसांना फार जास्त गृहीत धरतो. एका क्षणी आपल्याला लक्षातही येणार नाही की जादू व्हावी तशी गायब होतात माणसं आपल्या आयुष्यातून. अगदी कायमची निघून जातात… देवाघरी वगैरे… तेव्हा दुःख वाटून घेण्यात फारसा अर्थ नसतो. कारण ती सल, त्या जखमा मग आयुष्यभर आपली पाठ सोडत नाहीत… त्यातून बाहेर निघणंदेखील कैकदा खूप अवघड होतं.

त्यामुळे खऱ्या सुखाची आपली संकल्पनाच एकदा आपण तपासून बघायला हवी. आभासी जगात रमून मिळणारं सुख की आपल्या आवडीनिवडी जपत आपली जिवाभावाची माणसं जपत साजरा केलेला आनंदोत्सव.
सुख आपल्या मानण्यावर असतं ना, मग करून बघा एकदा धमाल, जगून बघा एकच दिवस स्वतःला व आपल्या जिवाभावाच्या मंडळींना हवा तसा वेळ देऊन… जगून बघा एक उनाड दिवस…

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये