राज्यात वाघांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता

प्राणी प्रगणना आटोपली असली तरी अद्यापही अहवाल मिळाला नाही. अहवाल आल्यानंतर वन्यजीवनिहाय वर्गवारी केली जाणार आहे. त्यानंतर वाघ, बिबट आणि इतर वन्यप्राण्यांची संख्या निश्चित होईल. राज्याचे पर्यावरणीय वातावरण बघता वाघांची संख्या वाढेल, यात दुमत नाही.
सुनील लिमये, (प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र)
डेहराडून/अमरावती : कोरोनाच्या कालखंडात स्थगित राहिलेली व्याघ्रगणना तीन वर्षांनंतर राज्यात ऑफलाईन पद्धतीने झाली. नुकत्याच झालेल्या बुद्ध पौर्णिमेला सर्व अभयारण्यात वन्यप्राणी गणना आटोपली आहे. त्यामुळे राज्यात वाघांची अचूक आकडेवारी पुढे येणार आहे. प्राथमिक अहवालानुसार वाघांची संख्या दुप्पट झाल्याचे शुभसंकेत मिळत आहेत.
डेहराडून येथील वन्यजीव संस्थेच्या निर्देशानुसार, देशात एकाच वेळी वाघांची प्रगणना करण्यात आली. त्याकरिता वाईल्ड लाईफ संस्थेने एक अॅपही विकसित करून दिले होते. सात दिवसांत वाघांसह अन्य वन्यजीवांच्या प्रगणनेची नोंद करण्यात आली आहे.
राज्याच्या ५०० वनपरिक्षेत्रात सात दिवस सतत ही मोहीम राबविण्यात आली. प्रगणनेचा ऑनलाईन डेटा डेहराडून येथे पाठविण्यात आला आहे. मात्र, राज्यात वाघांची आकडेवारी पाचशेच्या वर जाण्याचे संकेत आहेत. वाघांच्या संख्येसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प नंबर १ वर आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यदेखील वाघांच्याबाबतीत सरस आहे. कारण टिपेश्वर येथे नवतरुण वाघांची संख्या ३५ च्या आसपास गेल्याची माहिती आहे. चंद्रपूर-ताडोबा-टिपेश्वर हा वाघांचा कॅरिडॉर झाला आहे. चंद्रपूरचे वाघ टिपेश्वरपर्यंत प्रवास करीत आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातसुद्धा वाघांची संख्या १५ टक्क्यांनी वाढण्याचे संकेत आहेत. पेंच, सह्याद्रीत वाघांची संख्या ५ टक्के वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विदर्भात वाघांची संख्या ४०० च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. ताडोबा, टिपेश्वर, नागझिरा, नवेगाव बांध, यवतमाळ, वणी, वरोरा, उमरेड, करांडला, बुलडाणा, किनवट या भागात वाघांची संख्या २ ते १० इतकी आहे. या भागात चंद्रपूर, ताडोबा येथून वाघ येत असल्याची माहिती आहे.