‘येणाऱ्या काळात महाराष्ट्राची जनताच त्यांना खड्ड्यात टाकणार’; नवनीत राणांचा संजय राऊतांवर निशाणा
मुंबई : खासदार नवनीत राणा यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर त्यांचं मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आलं. तसंच रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर नवनीत राणांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला असून संजय राऊतांवर देखील निशाणा साधला आहे.
यावेळी नवनीत राणा म्हणाल्या, ज्या पद्धतीने पोपटाने नागपूरच्या पत्रकार परिषदेत २० फूट खोल खड्ड्यात गाडू असं म्हटलं होतं. येणाऱ्या काळात मुंबई आणि महाराष्ट्राची जनताच त्यांना खड्ड्यात टाकणार यात दुमत नाही. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मी दिल्लीला जाणार आहे आणि त्यांच्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांकडे तक्रार करणार आहे.
नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना आव्हानही दिलं. त्या म्हणाल्या,” ठाकरे सरकारने सत्तेचा दुरुपयोग केला आहे. माझं उद्धव ठाकरेंना आव्हान आहे की, त्यांनी लोकांमध्ये येऊन निवडणूक लढवून आणि जिंकून दाखवावी. त्यांच्याविरोधात एक महिला उभी राहील. तुम्ही कोणत्याही मतदारसंघातून लढा, मी तुमच्या विरोधात असेन हा माझा इशारा आहे. माझ्यावर त्यांनी जे अत्याचार केलेत, त्याचं उत्तर पुढच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जनताच देईल. ठाकरेंची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मी उभी राहीन आणि शिवसेनेविरोधात प्रचार करीन.”