ताजमहालात भगवान शंकराचा निवास; भाजपाचा दावा

नवी दिल्ली : ताजमहाल मधील बंद असलेल्या २२ खोल्यांमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती आहेत, असा दावा भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे. या खोल्या उघडून चौकशी करण्यात यावी, अशी याचिकाही या नेत्याने अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केली आहे. लखनौ खंडपीठाकडे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. अयोध्येत भाजपाच्या सोशल मीडिया प्रभारींनी ही याचिका दाखल केली आहे. या सर्व खोल्या उघडून तपास करण्याचे आदेश पुरातत्व विभागाने द्यावेत, असं या याचिकेत म्हटलं आहे.
दरम्यान, या याचिकेत काही इतिहासकार आणि काही हिंदू गटांचा संदर्भही देण्यात आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ताज महाल हा पूर्वी एक जुनं शंकराचं मंदिर होतं. काही लोकांचं असंही म्हणणं आहे की, तेजो महालय अर्थात ताज महाल हे ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाण आहे, असंही या याचिकेत म्हटलं आहे. मात्र पी.एन.ओक आणि लाखो हिंदू भाविकांचा हा विश्वास आहे की या बंद खोल्यांमध्ये भगवान शंकरांचं अस्तित्व आहे, असा उल्लेखही या याचिकेत करण्यात आला आहे.