सेवा हीच सर्वश्रेष्ठ या भूमिकेतून काम करावे – राज्यपाल
राज्य लोकसेवा हक्क आयोग पुणे महसुली विभाग कार्यालयाचे उद्घाटन
पुणे : लोकप्रतिनिधी, प्रशासनातील उच्चपदस्थापासून शेवटच्या स्तरातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपण जनतेच्या सेवेसाठीच आहोत; नागरिकांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा आहे या भूमिकेतून काम करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
पुणे महानगरपालिकेच्या ढोले रोड क्षेत्रीय कार्यालय इमारतीमध्ये सुरू करण्यात आलेल्या राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या पुणे महसुली विभाग नवीन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग मुख्य आयुक्त दिलीप शिंदे, राज्य सेवा हक्क आयुक्त नाशिक चित्रा कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग माजी मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, मनपा आयुक्त विक्रम कुमार, पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
श्री. कोश्यारी म्हणाले, देश स्वतंत्र झाला तेव्हा खूप मर्यादित सेवा दिल्या जात होत्या. पुढे जनतेचे कल्याण आणि समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी त्यात भर पडत गेली. सनदी सेवांमध्ये उत्तीर्ण झालेले तरुण उमेदवार ‘पब्लिक सर्व्हिस’ कमिशनमधून आले आहे, अर्थात सेवा हेच शासनाचे मुख्य काम आहे हे लक्षात घ्यायला हवे.
राज्यपाल पुढे म्हणाले, जनतेला कशा प्रकारे दिलासा देता येईल, हे पाहणे आपले काम आहे.
जनतेच्या समस्यांसाठी अनेक आयोग निर्माण करण्यात आले असून या आयोगांनी चांगल्या प्रकारे निर्णय घेण्याचे काम केल्यास जनतेचे कल्याण साधले जाईल. जनतेच्या कल्याणासाठी शासन, प्रशासनामध्ये सुधारणा व संशोधन करावे लागेल. डिजिटायझेशनमध्ये देश अग्रेसर असून ते पुढे न्यायचे आहे, असेही श्री. कोश्यारी म्हणाले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.