पुणेराष्ट्रसंचार कनेक्टशिक्षणसिटी अपडेट्स

झाडाखाली भरवली जाते शाळा

अनागोंदी कारभार आला चव्हाट्यावर

उरुळी कांचन : पुणे जिल्हा परिषदेच्या पूर्व हवेलीमधील एका प्राथमिक शाळेला इमारत नसल्याने पावसाळ्यात शाळाच बंद ठेवण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. शाळेत पहिली ते चौथी अशा चार वर्गात ऐंशीहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून ही शाळा बंद झाल्यास या सर्व विद्यार्थ्यांचे काय होणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनामदारवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा… ‘‘इनामदारवस्ती’’ हे त्या शाळेचे नाव असून मागील पाच ते सहा वर्षांपासून शाळेला स्वतःची जागा व इमारत नसल्याने मुलांना ऊन, वारा आणि पावसात शिक्षण घ्यावे लागत आहे. अधिकार्‍यांच्या वेळकाढू धोरणामुळे ही परिस्थिती शाळेवर आली आहे. या शाळेला स्वतःची जुनी इमारत होती, नेमकी ती कोठे गेली, कोणी यासाठी आदेश दिला की न्यायालयाने आदेश दिला हे कोणीही खात्रीलायकपणाने सांगत नाहीत, त्यामुळे या शाळेबाबतचा संशय बळावला आहे.

याबाबत बोलताना हवेली पंचायत समिती गटविकास अधिकारी तथा प्रशासक प्रशांत शिर्के म्हणाले की, पुणे – सोलापूर महामार्गावर कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनामदारवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेत पावसामुळे दोन वर्ग बंद करावे लागणार आहे, याबाबतची माहिती माझ्याकडे आली आहे. संबंधित शाळेबाबत नेमके काय करता येईल व शाळेची जागा नेमकी कोणी लाटली? याची माहिती मागविण्यात आली आहे.

याबाबत शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शाळेचे रस्त्यालगत असलेली जागा काही दिवसांपूर्वी एका स्थानिक शेतकर्‍याने ताब्यात घेतली. त्यावेळी पंचायत समितीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या मध्यस्थीने जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी जागा देण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, ही जागा दिली न गेल्याने सध्या शाळेला दोन पत्र्याच्या शेडमध्ये शाळा भरवावी लागत आहे.

त्या शाळेच्या इयत्ता पहिली ते चौथी चे चार वर्ग असल्याने दोन वर्ग पत्र्याच्या शेडमध्ये तर दोन वर्ग रस्त्यावर आणि झाडाखाली भरवावे लागत आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वात सधन तालुका अशी ओळख असलेल्या हवेली तालुक्यात ही लाजिरवाणी घटना घडत आहे. शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांना ही गोष्ट वारंवार सांगितली असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र अशोक पवार या संदर्भात दखल घेत नसल्याची खंत नागरिक बोलून दाखवत आहेत. याबाबत पंचायत समितीशी वारंवार पत्रव्यवहार करूनही कारवाई होत नसल्याने पाऊस आल्यास शाळा बंद ठेवण्याशिवाय संबंधित शाळेकडे पर्याय उरला नाही. वरिष्ठांनी यात लक्ष घालून शाळेच्या जागेचा प्रश्न त्वरित सोडवावा व शाळेसाठी लवकर चार वर्गखोल्या बांधून द्याव्यात. अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.
फोटो ओळ :- त्याचे दोन फोटो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये