अग्रलेखराष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

गुजरात दंगलीचा उत्तरार्ध

आर. के. राघवन यांची त्या एसआयटीच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आणि त्यांनी तिस्ता सेटलवाड यांची योजना संपवली. त्यानंतर जलदगती न्यायालयात हे प्रकरण नेण्यात आले. तिथले न्या. जोशी यांनीही तिस्ता दबाव टाकत असल्याचे सांगितले होते. या सगळ्याचा धांडोळा घेतला तर गुजरात दंगल खटल्याचा उत्तरार्ध आता सुरू झाला आहे. या दंगलीतल्या मुख्य ६३ पैकी मोदी, शहा निर्दोष मुक्त झालेत. आता तिस्ता आणि तिच्या साथीदारांची वेळ आहे. समय का पहिया चलता रहता है…!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुजरात दंगलीतल्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली. गेल्या आठवड्यात ही घटना घडली. क्लीन चिट मिळाल्यावर तपासी यंत्रणांनी या सगळ्या प्रकरणात काही ना काही कारणांनी गुंतलेल्या तिस्ता सेटलवाड यांना अटक केली आहे. सेटलवाड यांच्या अटकेबद्दल परदेशातील जागतिक संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हा निर्णय योग्य नसल्याचा सूर आळवला आहे. मोदी विरोधकांकडून यापलीकडे काही घडणार नाही, किंबहुना मोदींना कायमस्वरूपी कोर्टाने निर्दोष जाहीर केल्यावरही कायम त्यांच्यावर दंगलखोर आणि मौत के सौदागर म्हणण्यात धन्यता वाटते, हे अनेकदा जाहीर झाले आहे.

खरे तर मौत के सौदागर ज्यांना म्हटले जाते त्यांनी गेली साडेसात वर्षे पंतप्रधान म्हणून काम केले आहे. २०१४ साली झालेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आणून दाखवल्या आहेत. विविध राज्यांत भारतीय जनता पक्षाने स्वबळावर सरकार स्थापन करून दाखवले आहे. ज्या अमेरिकेने त्यांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती त्यांनी मोदी यांना सन्मानाने पायघड्या घातल्या आहेत. गेल्या तिन्ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याचे धोरण ठेवले आहे. अशा परिस्थितीत तिस्ता सेटलवाड यांच्या बाजूने गळे काढणार्‍या आणि नरेंद्र मोदी यांना कायम दोषी ठरवणार्‍यांनी एकदा आत्मपरीक्षण केले पाहिजे. राजकारण स्वयंसेवी संस्था चालवणार्‍यांच्या मतावर आणि मनावर चालत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. बरं सेटलवाड यांच्या बाजूने ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्या कशा आणि कोणासाठी चालवल्या जातात याचाही विचार केला पाहिजे. या स्वयंसेवी संस्था देशातल्या विघातक शक्तींना रसद पुरवणार्‍या व्यक्ती आणि संस्थांना मदत करतात, असा मोठा समज आहे. तिस्ता सेटलवाड यांच्या अटकेनंतर त्यांना कोण कोण कशी मदत करते याची माहिती समोर आली आहे.

समाजमाध्यमांवर दिली जाणारी माहिती खरी किती आणि खोटी किती याचा अंदाज स्वतःच्या विवेकबुद्धीवर विश्वास ठेवून घ्यायचा असतो. मात्र असे असले तरी धूर निघत असेल तर आगीचा संपर्क त्या प्रकरणाला झाला असणार हे नक्की आहे. तसेच समाजमाध्यमांवरच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवणे अवघड आणि अशक्य असले तरी त्यातला काही भाग नक्कीच सत्य आणि वस्तुनिष्ठ असेल असेही मानण्यास हरकत नाही. या माहितीत सेटलवाड यांची संपत्तीची आकडेवारी दिली आहे. मोक्याच्या आणि अतिश्रीमंत भागात असलेल्या मालमत्ता यांचा अंतर्भाव आहे. तसेच स्वयंसेवी संस्था आणि इतर संस्थांकडून मिळालेली आर्थिक मदत, त्याचा वापर त्या कशा करतात याचा तपशीलही दिला आहे. या सगळ्या प्रकारात सेटलवाड यांनी मोदींना अडकवण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले याची माहिती आता समाजमाध्यमातून फिरत आहे.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आणि सेटलवाड यांच्या वडिलांचे कसे घनिष्ठ संबंध होते आणि हिंदू कायदे रद्द करण्यात, बदलण्यात तिस्ताच्या वडिलांचा कसा हात होता हे आता सांगितले जात आहे. श्रीकुमार, संजीव भट्ट, मुकुल सिन्हा आणि राणा आयुब यांना हाताशी धरून मोदींना अडकवण्याचा चक्रव्यूह काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांच्या साहाय्याने कसा रचला याचा भंडाफोड जाहीर केला जात आहे. न्या. एम. बी. सोनी यांनी आपल्या खुलाशात स्पष्ट केले होते की, गुजरात दंगलीशी संबंधित कोणतीही याचिका सेटलवाड सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली की, ती न्यायमूर्ती आफताब आलम यांच्या खंडपीठाकडे वर्ग केली जात असे. याचे कारण तिस्ता सेटलवाड यांच्या सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पिस या स्वयंसेवी संस्थेत सेटलवाडबरोबर भागीदार होती. याचा संबंध न्या. आफताब यांच्याकडे याचिका दाखल करणे आणि तिस्ताला जामीन देणे यासंदर्भात आहे का, याचे उत्तर कोणतीही शहाणी व्यक्ती सहज देऊ शकेल. तिस्ताच्या स्वयंसेवी संस्थेस जी आर्थिक मदत मिळत होती ती फोर्ड या संस्थेकडून मिळत होती. फोर्ड आपल्या देशाच्या एकतेला धक्का देणार्‍या संस्था आणि व्यक्तींना मदत करते, असा अंदाज नव्हे खात्री भाजप गटातली मंडळी व्यक्त करतात. गुजरात दंगलीत मोदी आणि शहा यांचा हात होता, यासंदर्भात झालेल्या बैठकीस मी उपस्थित होतो, अशी साक्ष संजय भट्ट याने दिली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी जी एसआयटी नेमण्यात आली होती, त्याला प्रशांत भूषण आणि राजू रामचंद्रन हे दोघे मदत करीत होते. राजू रामचंद्रन हा अजमल कसाबचा वकील होता.

मात्र आर. के. राघवन यांची त्या एसआयटीच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आणि त्यांनी सेटलवाड यांची योजना संपवली. त्यानंतर जलदगती न्यायालयात हे प्रकरण नेण्यात आले. तिथले न्या. जोशी यांनीही तिस्ता दबाव टाकत असल्याचे सांगितले होते. या सगळ्याचा धांडोळा घेतला तर गुजरात दंगल खटल्याचा उत्तरार्ध आता सुरू झाला आहे. या दंगलीतल्या मुख्य ६३ पैकी मोदी, शहा निर्दोष मुक्त झालेत. आता तिस्ता आणि तिच्या साथीदारांची वेळ आहे. समय का पहिया
चलता रहता है…!

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये