ताज्या बातम्यापुणेरणधुमाळीसिटी अपडेट्स

“…तर आम्ही कसबा पोटनिवडणूक लढवण्यास तयार”, रूपाली पाटील-ठोंबरेंचं मोठं विधान

पुणे | Kasba Peth Constituency By Election – गुरूवारी पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार, माजी महापौर मुक्ता टिळक यांनं निधन झालं. त्यामुळे आता पुण्याच्या राजकारणात रिक्त झालेल्या जागेसाठीच्या कसबा पोटनिवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी या जागेवरून पोटनिवडणूक लढण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. तसंच ही निवडणूक बिनविरोध होऊ नये, असं विधानही त्यांनी केलं आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

यावेळी रुपाली पाटील-ठोंबरे म्हणाल्या की, “कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई टिळक (Mukta Tilak) यांचं निधन झालं आहे. त्या आजारी होत्या. त्यांच्याऐवजी आता जी पोटनिवडणूक लढणार आहे त्यामध्ये पक्षानं जर आदेश दिला तर मी ही निवडणूक लढवणार आहे. पण ही पोटनिवडणूक जाहीर झाली पाहिजे. पक्षाच्या आदेशासाठी आम्ही तर तयार आहोत. जर पक्षानं आदेश दिला तर आम्ही निवडणूक लढवण्यास तयार आहोत.”

पुढे पत्रकारांनी ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं तुम्हाला वाटत नाही का ? असा प्रश्न रुपाली पाटील-ठोंबरेंना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “2019 ला जी निवडणूक झाली त्यामध्ये मुक्ताताई आमदार झाल्या. तेव्हापासून त्या आजारी होत्या. तरीही त्यांनी जेवढं शक्य होतं तेवढं काम केलेलं आहे. त्याआधी 30 वर्ष गिरीष बापट (Girish Bapat) सर आमदार होते. मतदार पोटनिवडणूक झाल्यानंतर ठरवतील ना की कोणाला निवडणूक द्यायचं. असं असतं की पोटनिवडणूक बिनविरोध करावी. मात्र, ही अपेक्षा कोणी करावी ज्यांनी सगळ्याच पोटनिवडणुका बिनविरोध केल्या असतील. मुंबईत जी पोटनिवडणूक झाली त्यावेळेस त्या महिलेला कोणी किती त्रास दिला हे सगळ्यांनी पाहिलंय. तसंच जी पोटनिवडणूक लागणार आहे ती अशीच खेळीमेळीत पार पडावी अशी अपेक्षा आहे”, असंही रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये