भोंग्याचा आवाज सत्याचा हवा, सत्तेचा नको

डॉ. श्रीपाल सबनीस यांचे परखड मत
लोकराजा छत्रपती शाहूमहाराज स्मृती शताब्दीनिमित्त फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचातर्फे अॅड. डॉ. सुधाकरराव आव्हाड यांना डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते छत्रपती शाहूमहाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी (डावीकडून) सबनीस, आव्हाड आणि अॅड. प्रमोद आडकर, प्रेरणा गायकवाड आणि विठ्ठल गायकवाड.
पुणे : भोंगा या विषयावरून सुरू असलेले राजकारण निंदनीय असून भोंग्याचा आवाज सत्याचा हवा सत्तेचा नको, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचातर्फे लोकराजा छत्रपती शाहूमहाराज स्मृती शताब्दीनिमित्त ‘मानव जोडो और भाईचारा बढाओ’ या अभियानांतर्गत यंदाचा छत्रपती शाहूमहाराज पुरस्कार अॅड. डॉ. सुधाकरराव आव्हाड यांना डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी सबनीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह अॅड. प्रमोद आडकर होते.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा पुणे मनपाच्या स्थायी समिती सदस्या लता राजगुरू आणि प्रेरणा गायकवाड, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. पांडुरंग थोरवे आणि फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे संस्थापक विठ्ठल गायकवाड, भाई कात्रेे, प्रेरणा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, महाराष्ट्राला लाज वाटावी, अशी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे. संस्कृती सत्यावर उभी राहत असते. परंतु, राजकारणी जाती-धर्माच्या नावावर विषाची पेरणी करीत आहेत. छत्रपती शाहूमहाराज राजे असूनही त्यांनी सातत्याने लोकशाहीच्या मूल्यांना चालना आणि प्रेरणा दिली. जाती-धर्माच्या भिंतींच्या पलीकडे जाऊन शाहूमहाराजांनी मुस्लिम कलाकारांनादेखील प्रोत्साहन दिले.
महाराष्ट्राला शाहूमहाराजांसारख्या बहुसांस्कृतिक आणि बहुधार्मिक ऐक्याची भूमिका मांडणार्या नेत्याची गरज आहे.
पुरस्काराला उत्तर देताना अॅड. डॉ. सुधाकरराव आव्हाड म्हणाले की, संपूर्ण भारतात महाराष्ट्र राज्य पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. परंतु, अलीकडच्या काळात सुरू असलेले राजकारण पाहता पुरोगामी महाराष्ट्र या प्रतिमेला धक्का बसत आहे. महाराष्ट्राला फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारधारेचा वारसा लाभलेला असून त्या वारशाला तात्पुरत्या राजकारणामुळे गालबोट लागायला नको.