उलगडणार ऐतिहासिक चित्रपटांच्या जन्माची कथा

पिंपरी : ऐतिहासिक चित्रपटांची, नाटकांची आणि दूरचित्रवाणी मालिकांची निर्मिती हे खरोखरच सर्वार्थाने आव्हानात्मक मानले जाते. या ऐतिहासिक कलाकृतींच्या जन्माची कथा येत्या शनिवारी (२५ जून) रसिकांपुढे उलगडणार आहे. निमित्त आहे एमपीसी न्यूज ‘कला संवाद’ आयोजित ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ या वेगळ्या धाटणीच्या कार्यक्रमाचे! चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी (२५ जून) दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केलेले नामवंत अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे, अनेक चित्रपटांसाठी भव्य-दिव्य व कलात्मक सेट उभारून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेले ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना पुन्हा ऐतिहासिक नाटकांकडे खेचून आणणारे ताकदीचे अभिनेते अविनाश नारकर, छत्रपती शाहू महाराजांची भूमिका समर्थपणे सादर करणारे अभिनेते राहुल सोलापूरकर हे मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नामवंत मुलाखतकार सुधीर गाडगीळ हे कार्यक्रमाचे सूत्रसंवादक असणार आहेत.
दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी त्यांच्या काळात एकापेक्षा एक सरस ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती केली. तो मराठी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षांत मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा ऐतिहासिक चित्रपटांची लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. भालजी पेंढारकर यांचा ऐतिहासिक चित्रपटांचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न नव्या दमाचे दिग्दर्शक, अभिनेते, कला दिग्दर्शक आपापल्या परीने करीत आहेत. त्याला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.