डांबरमिश्रित खडीचे तापमान तपासलेच जात नाही

ठेकेदारांकडून तापमानाच्या नोंदी केवळ कागदावरच
पुणे : आठवडाभर पडलेल्या पावसाने शहरातील रस्त्यांची शब्दश: चाळण झाली आहे आणि त्यातून वाहने चालवताना मानदुखी, पाठदुखी पुणेकरांच्या पाचवीला पुजू लागली आहे. शहरातील रस्त्यांवर असलेल्या हजारो खड्ड्यांमुळे पुणेकरांचे आरोग्यही खड्ड्यात चालल्याची संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर हा प्रवास रस्त्यांवरील खड्डे, खाचखळगे चुकवताना होणारी कसरत याचा परिणाम म्हणून खांदेदुखी आणि हातांमधून मुंग्या येणे असे आजार वाढत आहेत. पुणेकरांचे खड्डेमय रस्ते आणि वाहतूककोंडीतून वाट काढताना आरोग्याचे तीनतेरा वाजले आहेत. पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालवताना खड्डे पटकन दिसत नाहीत आणि गाडी आपटून दुखापत होते. खड्डे, खाचखळग्यांमधून वाहन चालविताना स्नायू दुखावल्यामुळे आणि मणक्याच्या विकारामुळे मानदुखी, पाठदुखी उद्भवत आहे. दुखणे वाढल्यामुळे डॉक्टरांकडे जाणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे, असे निरीक्षण जनरल फिजिशियन डॉ. रोहित औटी यांनी नोंदवले.
हॉटमिक्सचे तापमान ठेवले न गेल्यास रस्ता दुरुस्ती योग्य पद्धतीने होत नाही. परिणामी, रस्ते व खड्डे दुरुस्तीनंतर लगेच खड्डे पडतात. त्यामुळे पैसा तर वायफळ जातोच, पण नागरिकांचीही गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन तातडीने यासाठी तपासणी यंत्रणा उभारली जावी.
-विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच
जुलै महिन्यातच महापालिका प्रशासनाने केलेली निकृष्ट कामे खड्ड्यांच्या रूपाने समोर आली आहेत. खरेतर याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि खड्डे बुजवण्याची कार्यवाही वेगाने करावी. शहरात यंदा गेल्या काही वर्षांपेक्षा जास्त खड्डे पडल्याचे जाणवत आणि दिसत आहे. या स्थितीला बेसुमार रस्तेखोदाई जबाबदार आहेच, पण रिसर्फेसिंग करण्यात आलेल्या अनेक रस्त्यांवर डांबरमिश्रित खडीचे तापमान तपासले जात नसल्याचेही समोर आले आहे. इंडियन रोड काँग्रेसच्या (आयआरसी) निकषानुसार हे रिसर्फेसिंग होते की नाही, याची कोणतीही तपासणी महापालिका अथवा रस्ते विकसित करणाऱ्या ठेकेदारांकडून केली जात नाही. त्यामुळे हे रस्ते उखडून त्यावर खड्डे पडत आहेत. अवघ्या काही दिवसांतच या दुरुस्तीच्या कामाची वाताहत होत आहे. त्यामुळे प्रत्येक रस्त्याच्या कामासह खड्डे दुरुस्तीसाठी पालिकेने ही तपासणी बंधनकारक करावी, अशी मागणी केली जात आहे.
रस्ते विकसित करताना ठेकेदारांकडून या तापमानाच्या नोंदी केवळ कागदावर दाखविल्या जातात, तर प्रत्यक्षात खड्डे दुरुस्त करताना एका ट्रकमध्ये हॉटमिक्स आणून ते टप्प्याटप्प्याने खड्डयावर टाकतात आणि नंतर रस्त्यावर असलेले बिगारी हे हॉटमिक्स पसरून नंतर त्यावर रोलर फिरवितात. मात्र, तोपर्यंत या हॉटमिक्सचे तापमान घटून निकषाच्या कितीतरी खाली आलेले असते. परिणामी, अवघ्या काही दिवसांत ही खड़ी डांबरातून बाजूला पडून रस्ते उघडण्यास सुरुवात होते. त्याचा त्रास पुणेकरांना होतो.