चिखली जलशुद्धीकरण प्रकल्प ‘फेज-२’ च्या कामाचा ‘श्रीगणेशा’

पिंपरी-चिंचवड शहराचा आगामी २५ वर्षांत वाढती लोकसंख्या गृहीत धरुन पाणी पुरवठा सक्षम होईल, असा आंद्रा, भामा आसखेड प्रकल्प प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पातील आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन वितरीत केले जात आहे. आता भामा आसखेड धरुणातून १६८ एमएलडी उपलब्ध करण्यासाठी चिखली जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या फेज-२ चे कामाचा ‘‘श्रीगणेशा’’ करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात असून, आगामी जून- २०२५ पर्यंत शहराला मिळेल, असे नियोजन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचे ऑनलाईन भूमिपूजन झाले. यावेळी शहरातील लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकारी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड नगरपरिषदेची स्थापना १९७० मध्ये झाली. त्यानंतर १९८२ मध्ये महानगरपालिका स्थापना झाली. त्यावेळीपासून शहराला केवळ पवना धरणातून पाणी पुरवठा केला जात होता. २०१३ मध्ये तत्कालीन काँग्रेस आघाडीच्या सरकारने आंद्रा, भामा आसखेड धरणातून २६८ एमएलडी पाणी आरक्षीत केले. मात्र, पाणी पुन:स्थापना खर्च न भरल्यामुळे सदर आरक्षण रद्द झाले होते. दरम्यान, २०१७ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा सुरू केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवडला आंद्रा, भामा आसखेडचे पाणी आरक्षीत केले. २०१८ मध्ये सदर प्रकल्पाचे काम सुरू झाले.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. दि. १५ मे २०२३ रोजी हा प्रकल्प कार्यान्वयीत झाला. निघोजे- तळवडे येथील जॅकवेलमधून इंद्रायणी नदीतील पाणी उचलले जाते. त्यावर चिखली येथील प्रकल्पामध्ये प्रक्रिया करुन सदर पाणी भोसरी विधानसभा मतदार संघात वितरीत केले
जात आहे.