जुन्नरमध्ये उभारला जाणार जगातील सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

जुन्नर | गेल्या अनेक दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये (Junnar) झळकलेल्या फ्लेक्समुळे राजकीय चर्चा सुरु होत्या. जुन्नरचे माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख शरद सोनवणे (Sharad Sonawane) यांच्याकडून लावण्यात आलेले फ्लेक्स मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले होते. आता मात्र माजी आमदार शरद सोनावणे यांनी मोठी घोषणा केल्यामुळे चर्चांना पूर्णविराम लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा पुतळा जुन्नर येथे उभारण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी मंगळवारी (ता.12) चाळकवाडी येथील कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.
यावेळी सोनवणे यांनी सांगितले की कांस्य धातुमध्ये असणारा हा पुतळा स्वखर्चात एका वर्षाच्या आत उभा करून त्याचे लोकार्पण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुतळ्याची उंची, शिल्पकार व जागा निश्चित केलेली असुन त्याबद्दलची सविस्तर माहिती येत्या 29 सप्टेंबर रोजी देण्यात येणार असुन पुढील तीन महत्वपुर्ण घोषणा देखील त्यावेळी करणार आहेत. त्याचबरोबर ज्या प्रमाणे गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणुन ओळखला जातो त्याचप्रमाणे शिवरायांच्या या पुतळ्यासाठी एका घोषवाक्याची गरज असुन जनतेने ते वाक्य सुचवावे व ते 9967010504 या क्रमांका वर पाठवुन देण्याचे आवाहन सोनवणे यांनी केले जनतेला केले आहे.