देश - विदेशपुणेलेखशिक्षणसंपादकीय

विश्वात्मक भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारा जगातील सर्वांत मोठा घुमट

दृष्टीक्षेप | प्रा. डॉ. एस. एन. पठाण | माजी कुलगुरू

संस्कार आणि संस्कृती यांचे नाते जिव्हाळ्याचे असल्याचे मानले जाते, म्हणूनच प्रत्येक देशाचे वेगळेपण त्या देशातील संस्कृतीद्वारे ध्यानात येते. भारतात भिन्न जातिधर्मांचे लोक बंधुभावाने राहतात. विविधतेतील एकता हे या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. वेद, उपनिषदे हा या संस्कृतीचा ठेवा आहे. संत-महंतांनी कीर्तनाद्वारे समाजाचे प्रबोधन केले. समाजाच्या मनाची मशागत केली. भारतीय संस्कृती ही ज्ञान, भक्ती, कर्म, शौर्य आणि त्याग या आदर्शभूत पायांवर उभी आहे. माणसाच्या मनाचा आणि शरीराचा विचार करणारा योग हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. लहान वयात ही मूल्ये रुजल्यास देशासाठी आदर्श नागरिक घडवण्याचे कार्य भारतीय संस्कृतीद्वारे होते. सामाजिक जीवन समृद्ध झाले, की राष्ट्राची संस्कृती संपन्न होते. कुटुंब संस्थेच्या आदर्शभूत पायांवर उभी असणारी ही भारतीय संस्कृती, ही जगाला दिशा देण्याचे कार्य करते आणि म्हणूनच ती विश्वात्मक आहे. अनेक ज्ञानी, योगी आणि कर्तृत्वसंपन्न व्यक्तींच्या आदर्शातून पिढ्यान्पिढ्या आदर्श व्यक्ती घडवण्याचे कार्य भारतीय संस्कृती करीत असते. याचे जणू दर्शन या घुमटामध्ये होते.

तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर-तुकाराम विश्वशांती प्रार्थना सभागृह, राजबाग, पुणे एमआयटी या प्रसिद्ध संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी ‘देहू-आळंदी परिसर विकास’ या समितीच्या माध्यमातून आळंदी तीर्थक्षेत्री इंद्रायणी नदीच्या तिरी सुंदर दगडी घाट बांधले व विश्वशांतीचे कार्य सुरू केले. प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या कार्याची नोंद थेट पॅरिस येथील ‘युनेस्को’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने घेतली आणि १९९८ साली त्यांना “विश्वशांतीचा प्रसार’’ करण्यासाठी “युनेस्कोने अध्यासन’’ बहाल केले. प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या या कार्याची संपूर्ण महाराष्ट्रात खूप चर्चा झाली व त्याचा परिणाम म्हणून लोणी काळभोर, राजबाग हा १०० एकर परिसर प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्याकडे विश्वशांतीच्या कार्यासाठी चालत आला व त्यातून उभे राहिले सुंदर ए.डी.टी. विद्यापीठ व जगातील सर्वांत मोठा विश्वशांती घुमट.

मा. उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी २००६ रोजी ‘ए.डी.टी. विद्यापीठा’’च्या परिसरात मध्यभागी तीन एकर जागेवर १६० फुटी व्यास असलेला डोम उभारण्याचा संकल्प सोडला व काम सुरू केले. आसपासच्या ग्रामीण भागातील गवंडीकाम करणार्‍या तरुणांना बोलाविले, त्यांना प्रशिक्षण दिले व डोमचे कार्य सुरू झाले. डोमचे काम पूर्ण होण्यास तब्बल १२ वर्षे लागली व दि. २ ऑक्टोबर २०१८ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंती निमित्ताने भारताचे उपराष्ट्रपती मा. व्यंकय्या नायडू साहेब यांच्या शुभहस्ते या डोमचा शुभारंभ झाला. ‘शांती घुमटाकडे’ जाताना एक भव्य दगडी कमान आहे जी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची आठवण करून देते. पुढे सुंदर निळेशार पाण्याचा ३०० फूट लांब व २० फूट रुंद आकाराचा पाण्याचा तलाव आहे व त्यात विविध कारंजी बसवलेली आहेत.

विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय
डोममध्ये जाण्यासाठी ७२ फुटांपेक्षा अधिक लांबीच्या एकूण ४५ पायर्‍या, पांढर्‍याशुभ्र मकराना मार्बलमध्ये बसविलेल्या आहेत. या डोमला पूर्व, उत्तर व दक्षिण दिशेला अशी एकूण तीन भव्य प्रवेशद्वारे आहेत. बाहेरच्या बाजूला २४ पिलरवर २४ शास्त्रज्ञांचे भव्य पुतळे असून, प्रवेशद्वारावर एका बाजूला महान शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन, तर दुसर्‍या बाजूला महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांचे दर्शन होते. गोलाकार डोमच्या चहूबाजूने २४ शास्त्रज्ञ पाहून असे वाटते की, डोमच्या बाहेरच्या बाजूस विज्ञान व आतील बाजूने अध्यात्म या दोहोंच्या समन्वयासाठीच हा डोम उभारण्यात आला आहे याची खात्री पटते.

ज्ञानेश्वर महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय
डोमच्या तळमजल्याला १५४ खांब असून, त्यावर सुमारे ६५००० स्क्वेअर फूट बांधकाम झाले आहे. तळमजल्यावर ‘आत्मध्यान केंद्र’ आणि पहिल्या मजल्यावर ‘संतश्री ज्ञानेश्वर महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय’ उभारले आहे. तेथे १०८ कॉलम्स आहेत व या ग्रंथालयाच्या बाहेरच्या लॉबीमध्ये मोठमोठ्या चौकोनी काचेच्या फ्रेम करून जगामधील सर्व शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, विविध धर्मांचे प्रेषित यांची संपूर्ण माहिती त्या काचेवर इचिंग केली गेली आहे. ग्रंथालयाची बाहेरची लॉबी किती माहितीपूर्ण असू शकते, याची प्रचिती येते.

ध्यान केंद्र
या ग्रंथालयाच्या मध्यभागी वर्तुळाकार जागेवर १० कॉलम असून, तेथे मध्यभागी माऊलींची ध्यानस्थ मूर्ती आहे. हे ‘ध्यान केंद्र’ अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येक धर्मात ‘ध्यान करणे’ (मेडिटेशन) ही पद्धत आहेच. एवढेच नव्हे, तर इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर, मक्का येथे ‘हिरा’ नावाच्या गुहेत ध्यान करत असतानाच त्यांना ईश्वराचा साक्षात्कार झाला. बौद्ध, जैन आणि ख्रिश्चन धर्मांतदेखील ध्यानधारणेच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत व त्याची सविस्तर माहिती या ठिकाणी दर्शविलेली आहे.

अद्भुत रचना
१०८ पिलरवर उभा असलेला, ६५,००० चौ. फूटावर घुमट उभारण्याची संपूर्ण रचना (स्ट्रक्चरल डिझाईन), निर्मिती याचे पूर्ण पेटंट (स्वामित्व हक्क) प्रा. डॉ. विश्वनाथ कराड सरांचेच आहे. १६० फूट व्यासाचा हा घुमट केवळ २४ गोल पिलरवर उभा आहे. मुळात इतक्या मोठ्या व्यासाचा जगात अन्य घुमट नाहीच. हे २४ पिलर ६३ फूट उंच असून, बाहेरील बाजूने असलेली संपूर्ण गोलाकार ६३ फुटाची काँक्रीट रिग व गोल पिलर बाहेरच्या बाजूने शुद्ध पांढर्‍या मकराना मार्बलमध्ये मढवलेली आहेत. नंतर गोलाकार भिंती आतील बाजूने ४३ फुटापर्यंत, साग व शिसमच्या लाकडाने मढवून काढल्या आहेत. या लाकडावर ओम् व स्वस्तिकची नक्षी म्हणजे भारतीय कोरीवकामाचा उत्तम नमुनाच म्हणावा लागेल. या रिगच्या वरच्या बाजूने पुन्हा २२ फूट उंचीचे चौकोनी २४ पिलर असून, त्यांचा आकार येथे गोल ऐवजी चौकोनी होतो व या चौकोनी पिलरवर ९६ फूट उंचीचा अर्ध गोलाकार ज्याला आपण डोम (घुमट) म्हणतो तो दिसून येतो.

आपण डोममध्ये प्रवेश करताच आपल्या आश्चर्याला पारावार राहात नाही. डोमच्या आतील बाजूस निळेशार आकाश व हजारो चांदण्या (छोटे एलईडी लाइटस्) व पांढर्‍या ढगाची दाटी आपणांस जणू ब्रह्मांडाचीच जाणीव करून देते. म्हणजेच डोमची उंची ग्रंथालयापासून १८१ फूट उंच होते, परंतु डोम येथे संपत नाही तर त्याच्यानंतर डोमच्या वरच्या बाजूला १५.५ फूट उंचीचे सरस्वतीचे मंदिर आहे. मा. कराड साहेबांच्या आईचे नाव ‘सरस्वतीबाई’, परंतु सरांच्या लहानपणीच त्यांचे निधन झाले आणि आपल्या आईचे स्मरण म्हणून १८१ फूट उंचीवर ‘सरस्वती देवी’चे मंदिर व तेथे सरस्वती देवतेची पितळेची सुंदर मूर्तीची स्थापना करणे या सर्व घटना अकल्पित वाटतात आणि म्हणूनच प्रा. डॉ. विश्वनाथ कराड सतत सांगत असतात हे मी केलेले नाही हे कार्य माझ्याकडून माऊलींनी करून घेतले आहे. या सरस्वती मंदिरावर १५.२५ फूट उंचीचा कलश (पूजेचे पवित्र भांडे) व त्यावर १२.५० फूट उंचीचा नारळ (समृद्धीचे व पावित्र्याचे प्रतीक) त्यावर स्थापित झाला आहे व याच्यावर २७ फूट उंचीचा सोनेरी कळस बसविण्यात आला आहे आणि त्यामुळे ग्रंथालयापासून या डोमची उंची २६३ फूट इतकी झाली आहे. घुमटाच्या चारही बाजूला चार भव्य मिनारसारखे स्तंभ आहेत, परंतु त्याला ‘मंगलस्तंभ’ असे नाव देण्यात आले आहे.

जगातील सर्वांत मोठा घुमट
जगातील विविध घुमटांचा आपण अभ्यास केला तर असे दिसते की, सेंट पिटर्स् डोम, जो व्हॅटिकन सिटीमध्ये (इटली) आहे व जो १६२६ मध्ये बांधला गेला. या पवित्र घुमटाचा व्यास १३६.१ फूट असून, याची उंची ४४८.१ फूट इतकी आहे. सेंट पिटर्स डोम नंतर सर्वांत मोठा डोम म्हणून इटली येथील रोम शहरामधील पॅथेऑन डोमची चर्चा होते. हा इ. स. पूर्व ११३-१२५ या वर्षात बांधण्यात आला तर याचा व्यास १४२.३५ फुटांचा आहे. हा सेंट पिटर्सपेक्षा व्यासाने मोठा आहे. परंतु याची उंची केवळ १४२ फूट इतकी आहे. नंतर भारतातील बिजापूर येथील गोलघुमटाची चर्चा होते. जो १६५९ मध्ये विजापूरच्या आदिलशहाने बांधला व याचा व्यास १२४ फूट असून, याची उंची आतील बाजूने १७५ फूट, तर बाहेरील बाजूने १९८ फूट आहे.

.त्यानंतर जगप्रसिद्ध ताजमहालच्या घुमटाचा नंबर लागतो, जो भारतात उत्तर प्रदेशात आग्रा येथे आहे. हा डोम शहाजहान बादशहाने १६३२ ते १६५३ मध्ये बांधला. या डोमचा व्यास केवळ ५८ फूट असून, उंची मात्र २४३ फूट आहे. अशाप्रकारे जगातील विविध घुमटांचा अभ्यास केल्यानंतर आपण या अनुमानाला येतो की, विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दादाराव कराड यांच्या हातून एक जागतिक इतिहास घडविला गेला आहे. म्हणजेच हा “तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर-तुकाराम महाराज विश्वशांती प्रार्थना सभागृह’’ घुमट हा परिघाच्या तुलनेत जगात सर्वांत मोठा घुमट आहे.

महान संत, तत्त्वज्ञ व शास्त्रज्ञ
जगातील सर्वांत मोठ्या या घुमटाचे वैशिष्ट्य म्हणजे या घुमटामध्ये आतील व बाहेरील बाजूने ब्रांझ धातूचे एकूण ५४ लाइफ साइझ, ११ फूटी उंचीचे पुतळे स्थापन केले असून, ते जगातील सर्व धर्मांचे संस्थापक, महान संत, तत्त्वज्ञ व शास्त्रज्ञ आहेत. अशाप्रकारचे संग्रहालय कदाचित जगात कोठेही नसेल. प्रा. डॉ. विश्वनाथ कराडसर या सर्व विभूतींचा उेख ‘मेकर्स ऑफ दी वर्ल्ड’ असा करतात. जगाची जडणघडण करणारे हे संत, तत्त्वज्ञ व शास्त्रज्ञ आहेत. उदा. येशू ख्रिस्त, भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, शंकराचार्य, तर पाकिस्तानमधील बाबा बुेशहा यांचाही त्यात समावेश आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत कबीर, संत मीराबाई, संत रामदास इ. या सर्वांच्या मालिकेत प्रभू श्रीरामचंद्र यांना केंद्रस्थानी स्थान देण्यात आले आहे. तत्त्ववेत्त्यांमध्ये अ‍ॅरिस्टॉटल, सॉक्रेटिस, प्लेटो, कान्झ, हेगल इ. तत्त्ववेत्ते तर शास्त्रज्ञांमध्ये आइनस्टाइन, आयझॅक न्यूटन, आर्किमिडीज, फॅराडे, गॅलिलिओ, इ. अनेक शास्त्रज्ञांचा समावेश आहे. या डोमच्या शिखराची आतील रचना ब्रह्मांडासारखी असून, असे वाटते जणू हे सर्व संत, तत्त्ववेत्ते व शास्त्रज्ञांची गोलमेज परिषद येथे भरली असून, जणू ते या ब्रह्मांडात सुख, समाधान व शांती राहो याचीच चिंता करीत असावेत.

विश्वात्मक भारतीय संस्कृतीचे दर्शन
गौरवाची बाब म्हणजे ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस, लंडन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या चमूने शांती घुमटाला नुकतीच भेट दिली व जगातील विश्वशांतीचा सर्वांत मोठा शांती घुमट म्हणून याची नोंद घेऊन तशाप्रकारचे प्रमाणपत्रही प्रा. डॉ. विश्वनाथ कराड साहेब यांना बहाल करण्यात आले. या घुमटाला भेट दिल्यानंतर कुणीही हेच म्हणेल की, ‘भारत लवकरच विश्वगुरू बनेल व या घुमटाद्वारे विश्वात्मक भारतीय संस्कृतीचा, मानवतेचा, विश्वबंधुत्वाचा व सदाचाराचा विचार संपूर्ण जगामध्ये पोहोचेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये