ताज्या बातम्यारणधुमाळी

‘…तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवरही गुन्हा दाखल करा’; अविनाश जाधव

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल ठाण्यामध्ये आयोजित केलेल्या ‘उत्तर सभे’मध्ये राज ठाकरेंनी मंचावरच तलवार म्यानातून उपसून उंचावल्याच्या आरोपाखाली शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता मनसेने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री तसेच उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

मनसेचे ठाणे आणि पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंविरोधात तलवार उपसल्याप्रकरणी गुन्हा दाखल होत असेल तर असाच गुन्हा मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलावरही दाखल करावा अशी मागणी केली आहे. “सरकारच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. राज ठाकरेंना कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यात अडकवण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतोय. महाराष्ट्रात अनेक नेत्यांनी व्यासपीठांवर, सभेमध्ये तलावारी दाखवल्या आहेत. मग आजच का तुम्हाला वाटलं राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करायला हवा,” असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला आहे.

“असे अनेक गुन्हा राज ठाकरेंवर आहेत आमच्यावर आहेत, पण आम्हाला काही फरक नाही पडत. मात्र जे सुरु आहे ते चुकीचं सुरु आहे. राज ठाकरेंना काही बोलल्यानंतर ते तशाच प्रकारे पुराव्यासहीत उत्तर देतात. बोलायला काही राहिलेलं नाही. मग असे गुन्हे दाखवून त्यांची लायकी दाखवत आहे. दबावाला आम्ही कधी घाबरलेलो नाही पण कीव येते जे काही हे लोक करतायत त्याची,” असंही जाधव म्हणाले आहेत.

“जर राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल व्हायलाच हवा. तलवार दाखवणे ही एक प्रकारची संस्कृती आहे, त्यामुळे जर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. तसं होऊ देऊ नका, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये