‘…तर चौथा स्तंभ कोसळण्यास वेळ लागणार नाही’- शरद पवार
लातूर : ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला लातूरच्या उदगीर नगरीत सुरवात झाली आहे. छत्रपती शाहू महाराज सभागृहात व डॉ. ना.य. डोळे व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते सकाळी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं आहे. उद्घाटनापूर्वी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी चौकातून ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. शरद पवार यांनी यावेळी बोलताना प्रोपागंडा साहित्य निर्मितीमुळे निरंकुशतेला निमंत्रण मिळत असून आपल्या देशात असाच विशिष्ट प्रोपागंडा पद्धतशीर पसरवला जात असल्याचं म्हटलं आहे.
“राज्यकर्त्यांनी यासाठी साहित्य आणि माध्यमांची कमकुवत अंगे न्याहाळली आहेत. प्रसारमाध्यमांच्या बाबतीत त्यांनी अत्यंत हुशारीने कॉर्पोरेट जगाची मदत घेतली आहे. चित्रपट क्षेत्रातही त्याचा शिरकाव झाला आहे. हाच कॉर्पोरेटीकरणाचा प्रयोग आता साहित्यात होत आहे. तोट्यात असलेल्या प्रकाशन संस्था त्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. हे असेच सुरु राहिले तर चौथा स्तंभ कोसळण्यास वेळ लागणार नाही. हे टाळायचे असेल तर साहित्यिकांना डोळ्यात तेल घालून दक्ष रहावे लागेल,” असं शरद पवार म्हणाले आहेत.
आपल्या देशात विशिष्ट विचारधारेचा प्रचार फैलवण्याचा प्रयत्न काही घटकांकडून होत आहे याबद्दल जागरुक राहण्याची गरज आहे. तसंच साहित्यिक कोणत्याही विचारधारेला बांधील नसावेत असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.