खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून भाजपमध्येच रस्सीखेच सुरू

पुण्यातील सहाही जागांपैकी ५ जागांवर विद्यमान आनदारांनाच पसंती असल्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी आणि संतापाची लाट उसळली आहे.पुण्यामध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. उमेदवारीवरून पुण्यामध्ये भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही भाजपचे नगरसेवक निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्यामध्येच उमेदवारीवरून नाराजी आहे. अशामध्येच खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून भाजपमध्येच रस्सीखेच सुरू आहे.
भाजपच्या माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा भाजपच्या वरिष्ठांकडे व्यक्त केली. गेली १५ वर्षे नगरसेवक असताना आपण लोकांची काम केली आहेत. त्यामुळे मला विधानसभा निवडणूक लढवायची आहे अशी इच्छा त्यांनी वरिष्ठांकडे व्यक्त केली. मंगळवारी पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवकांची आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची शहर कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी ही मागणी केली आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीत भाजपने यावेळी उमेदवार बदलला पाहिजे, तरच ही जागा आपण जिंकू अशी मागणी काही माजी नगरसेवकांनी केली आहे. त्यामुळे आता भाजपचा खडकवासल्याचा उमेदवार कोण? पक्ष नेमकी कोणाला संधी देतोय. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी टी रवी, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अजय जामवाल, माजी संघटन मंत्री रघुनाथ कुलकर्णी शहराध्यक्ष धीरज घाटे हे पदाधिकारी उपस्थित होते.