ताज्या बातम्यारणधुमाळी

“शिवसेनेचा एक उमेदवार 100 टक्के पडणार”; अपक्ष आमदाराचा खळबळजनक दावा!

मुंबई | Ravi Rana On Shivsena – आज सकाळी ९ वाजल्यापासून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपाचे प्रसाद लाड यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. मतांचं गणित पाहता शिवसेनेचे दोन्ही उमेदवार सहजपणे निवडून येतील, असं चित्र आहे. यादरम्यान अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी खळबळजनक दावा केला आहे.

शिवसेनेचा एक उमेदवार १०० टक्के पराभूत होणार असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी केलेल्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसंच विधान परिषदेच्या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

रवी राणा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे की, “राज्यसभा निवडणुकीत संजय पवारांना जी मतं मिळाली, ती फक्त एकनाथ शिंदे यांच्या मेहनतीमुळे मिळाली आहेत. पण आज एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवून शिवसेनेनं ज्याप्रकारे विधान परिषद निवडणुकीची मांडणी केली आहे. ते पाहता शिवसेनेचा एक उमेदवार १०० टक्के पडणार आहे. गेल्या ५६ वर्षात जे घडलं नाही, असा धक्का शिवसेनेला विधान परिषदेत बसणार आहे. तसंच भाजपाचे पाचही उमेदवार निवडून येतील,” असं रवी राणा म्हणाले.

दरम्यान, विधान परिषदेत मी भाजपाला मतदान करू नये, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्यावर दबाव टाकत आहेत, असा आरोपही राणा यांनी केला आहे. त्यासाठी ठाकरे यांनी मुंबई आणि अमरावतीचे पोलीस आपल्या घरी पाठवले होते. पण मी घरी नसल्याने पोलीस मला अटक करू शकले नाहीत, असं देखील ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये