शालेय उपक्रमांमधून सुप्तगुणांचा शोध!

निगडी – PCMC News |‘‘शालेय उपक्रमांमधून सुप्तगुणांचा शोध घेण्याची संधी विद्यार्थ्यांना लाभत असते म्हणून त्यात सहभागी होऊन संधीचे सोने करीत व्यक्तिमत्त्व समृद्ध करा!’’ असा कानमंत्र ह.भ.प. जयश्री येवले यांनी गणेशनगर, थेरगाव येथे विद्यार्थ्यांना दिला.
याप्रसंगी जनलोक प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सुनंदा कदम, सहखजिनदार शशिकला भोंग, सदस्य सविता कांचन, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालक आसाराम कसबे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित खिंवसरा पाटील विद्यामंदिर येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभारंभी मार्गदर्शन करताना जयश्री येवले बोलत होत्या.
दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळेपासून दुरावलेल्या विद्यार्थी अन् पालक यांचा उत्साह सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांना प्रोत्साहित करणारा होता. आकर्षक फलकलेखन, स्वच्छता, टापटीप, सजावट केलेल्या शालेय संकुलात शैक्षणिक लेखन साहित्याचे वितरण करून शिक्षकवृंद आणि कर्मचारीवर्गाने हसतमुखाने विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
त्यापूर्वी, विद्यार्थी आणि शिक्षकांनी शालेय परिसरात जनजागृती फेरी काढून गणरायाचे आशीर्वाद घेतले. जनजागृती फेरीमध्ये वासुदेवाच्या वेषभूषेतील आसाराम कसबे आणि शिवाजी पोळ या जोडीने स्वरचित गीतांमधून शिक्षण, ज्ञान आणि मनोरंजनाचे महत्त्व पटवून दिले.